जबरी चोरी करणाऱ्या चौघांना दौंड पोलिसांनी केले जेरबंद, दौंड पोलिसांच्या गस्तीचा परिणाम

अख्तर काझी

दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावातील पुलाखाली वाहनांची वाट पाहत थांबलेल्या परप्रांतीयांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अनिकेत बाळू खंडाळे, तुषार विलास माने (दोघे रा. श्रीराम नगर, बारामती), यश दीपक मोहिते (रा.शरद नगर, बारामती), विशाल माने (रा. वाटर सोसायटी, अमराई, बारामती) अशी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार,दि.8 मे रोजी रात्री 1 वा. च्या सुमारास फिर्यादी शोभा कुमारी माधव भारती व त्यांचे नातलग इंदापूर ला जाण्यासाठी कुरकुंभ पुलाखाली वाहनाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातलगांना मारहाण केली व त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल संच असा एकूण 26 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान दौंड पोलिसांची या परिसरामध्ये रात्रीची गस्त चालू होती. पोलिसांना पाहताच फिर्यादी यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लागलीच परिसर पिंजून काढला व लूटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले.

दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची सध्या सर्वत्र रात्रीची गस्त सुरू आहे. त्यामुळे एखादी घटना घडलेली खबर मिळताच गस्तीवरील पोलिस पथके घटनास्थळी रवाना होत आहेत त्यामुळे चोरट्यांना मुद्देमालासह पकडण्यात त्यांना यश येत असल्याचे चित्र आहे. याच आठवड्यात रात्रीच्या वेळी दौंड मधील नियोजित क्रीडासंकुल बांधकामावरील स्टील चोरणाऱ्या चोरट्यांना दौंड पोलिसांनी जेलची हवा दाखविली आहे.