अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील विविध कंपन्यांचे बेकायदेशीरपणे उभारलेले टॉवर त्वरित काढून टाकण्यात यावे अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेने दौंड नगरपालिकेला दिला आहे. पॅंथर सेनेचे दौंड तालुका अध्यक्ष सागर उबाळे यांनी या कारवाईबाबतचे निवेदन दौंड नगरपालिकेला दिले आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड नगरपालिकेने सन 2000 पासून अनेक मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्याच्या हंगामी (मुदत एक वर्ष) परवानग्या दिलेल्या आहेत. दौंड नगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या नोंदी पाहता शहरातील अनेक टॉवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आले आहेत. ही बाब गंभीर असून त्यामुळे दौंड नगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल मोबाईल कंपन्या बुडवीत आहेत. ज्यामुळे दौंड नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. दौंड नगरपालिकेकडूनच मिळालेल्या माहितीनुसार दौंड नगरपालिका आर्थिक नुकसानात असल्याचे निदर्शनास आले आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांना नगरपालिकेकडून मिळणाऱ्या मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागत आहे.
शहरामध्ये 18 पेक्षाही जास्त अनधिकृत टॉवर दिसून येत आहेत, कायद्याने टॉवर उभारणीसाठी दरवर्षी नगरपालिकेची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असताना संबंधितांनी सन 2000 नंतर नगरपालिकेची परवानगीच घेतलेली नाही अशी माहिती मिळत आहे. कोणाच्या सांगण्यावरून या मोबाईल कंपन्यांना नगरपालिका पाठीशी घालत आहे याची चौकशी करण्यात यावी. शहरात उभारण्यात आलेले बेकायदेशीर मोबाईल कंपन्यांचे टॉवर तात्काळ पाडण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच ज्या कंपनीचे टॉवर कायदेशीर आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत शासनाचा जो महसूल बुडविला आहे त्या कंपन्यांकडून अतिरिक्त दंडासह महसूल वसूल करण्यात यावा अन्यथा सदरचे बेकायदेशीर टॉवर पॅंथर स्टाईलने काढण्यात येतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.