केडगाव : मी पोलीस आहे, तुम्ही गांजा, अफू विकणाऱ्या शिंदेला ओळखता का? तुमच्या खिशात काय आहे असे म्हणून एका वृद्धाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या लुटल्याचा प्रकार केडगाव स्टेशन रोडवर असणाऱ्या बारवकर मळा जवळ शुक्रवारी दुपारी 3 वाजता घडला आहे. याबाबत मल्हारी भिवा बारवकर यांनी आपली आपबीती ‘सहकारनामा’ (sahkarnama) ला सांगितली आहे.
केडगाव स्टेशनरोडवर बारवकर मळा येथे इंग्लिश मिडीयम जवळ एका दुचाकी स्वाराने मल्हारी भिवा बारवकर (वय 81, रा.केडगाव, गावठाण. ता.दौंड) यांना अडवून मी सी.आय.डी (CID) पोलीस आहे. तुम्ही शिंदे नावाच्या व्यक्तीला ओळखता का? तो अफू, गांजा विकतो अशी विचारपूस करत तुमच्या खिशात काय आहे असे म्हणत त्यांची झडती घेतली. त्यावेळी तेथून कामावर जात असलेल्या एका राजस्थानी मुलाला अडवून तू कोण आहेस, कुठे चालला आहे असे विचारून त्याच्या खिशातून रुमाल काढून त्याचे सर्व साहित्य त्या रुमालमध्ये टाकून त्याला बाजूला थांबवले आणि बारवकर यांच्या खिशातून रुमाल काढून त्यांचा चष्मा, अंगठ्या आणि इतर साहित्य त्यामध्ये टाकून त्या रुमालाला गाठ मारली. व रुमालात बांधलेले ते साहित्य बारवकर यांच्याकडे देऊन घरी जाईपर्यंत हा रुमाल उघडून पाहू नका असा दम देऊन त्यांना घरी जायला सांगितले.
बारवकर यांना थोडा संशय आल्याने त्यांनी पुढे जाऊन तो रुमाल उघडला असता त्यामध्ये त्यांची सोन्याची अंगठी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांना खात्री झाली की त्या व्यक्तीने त्यांची फसवणूक करत सोन्याची अंगठी चोरून नेली आहे. याबाबत त्यांनी थेट केडगाव पोलीस चौकी गाठत आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला आहे.