मराठा आरक्षणावर आजही तोडगा नाहीच ! शिवाय याही मागण्या अजून पूर्ण न झाल्याने उपोषण सुरूच राहणार

जालना : आज शनिवार दि.9 सप्टेंबर रोजी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे दिसत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावतीनेही तसे जाहीर करण्यात आले आहे.

‘सहकारनामा’ युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा

शासनाने सरसकट मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील आणि केली आहे. मात्र फक्त कुणबी-मराठा आरक्षण शासनाकडून जाहीर करण्यात आले असून बंद लिफाफ्यामध्येही सरसकट मराठा आरक्षणाबाबत कसलेही आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कुणबी आरक्षणामध्ये सर्व मराठा समाज येत नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडून आलेला प्रस्ताव अमान्य केला आहे. तसेच मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्यात यावे, ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते मागे घेण्यात यावे आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी शासनाकडे केली होती.

मराठा आरक्षणाबाबत काल रात्री जालना येथील आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. तर चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादाजी भुसे, जिल्हाधिकारी औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड हे ऑनलाईन सहभागी झाले होते.