पुणे : निवडणुका म्हटले की हार-जीत आलीच पण अनेकवेळा असे पहायला मिळते की उमेदवार निवडून आला की जनतेचे प्रेम आणि निवडणुकीत पडला की ईव्हीएम (EVM) मशिन चा घोळ असा आरोप केला जातो. मात्र पडणाऱ्या उमेदवाराकडून करण्यात येणारे हे सर्व आरोप बिनबुडाचे असतात आणि यात ईव्हीएम मशिन चा कोणताही रोल नसतो हे निवडणूक आयोगाने अनेक प्रकरणांमध्ये सिद्ध केले आहे. ईव्हीएम मशिन हॅक करून दाखवा आणि बक्षीस मिळवा असे आव्हानही त्यांनी मागील निवडणुकांमध्ये दिले होते मात्र ते कुणी स्विकारले नाही.
निवडणुकीत दोन्ही बाजूचे उमेदवार आपापल्या परीने प्रचार करून निवडून देण्याचे आव्हान करतात. यावेळी जनता ज्याला निवडते तो याचे श्रेय जनतेच्या प्रेमाला आणि आपल्या कामांना देतो मात्र जो निवडणुकीत पराभूत होतो तो मात्र सर्व खापर ईव्हीएम (EVM) मशीनवर फोडतो. आत्तातर व्हिव्हीपॅट मशीनसुद्धा आले आहे ज्यामुळे आपण कोणाला मतदान केले आहे हे त्या चिठ्ठीमध्ये छापून येते आणि त्या चिठ्ठया व्हिव्हीपॅट मध्ये सुरक्षित राहतात.
भारतातील लोकसंख्या पाहता येथे बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे आता शक्य नाही त्यामुळे पारदर्शकपणे ईव्हीएम मशिन आणि त्यासोबत जोडलेल्या व्हिव्हीपॅट मशिन च्या सहाय्याने मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.
त्यामुळे जिंकलो तर जनतेच्या प्रेमापोटी आणि हरलो तर ईव्हीएम मशिन मुळे हे प्रकार कमीतकमी यापुढे तरी समोर येऊ नये असेच म्हणावेसे वाटते.