..तर ‘भाजप’ ला दौंड तालुक्यात तीच अडचण उद्भवणार..!

राजकीय वार्तापत्रअब्बास शेख

पुणे : दौंड तालुक्यात भाजप फार पूर्वीपासून कार्यरत आहे. मात्र या पक्षाला कधी मोठे यश या तालुक्यात आले नाही. मात्र यावेळी तालुक्यातील जनतेने केवळ आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व झुगारून आपल्या नेत्याच्या मागे ठामपणे उभे राहून बारामती आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला शह देण्याचे काम केले आणि पहिल्यांदाच या तालुक्यात भाजपच्या चिन्हावर येथील आमदार निवडून दिला.

दौंडची जनता ज्या निर्णयाकडे टक लावून बसली आहे तो निर्णय म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आहे. मंत्रिमंडळ विस्तार होताना भारतीय जनता पार्टीला दौंडचा विचार करावाच लागणार आहे. कारण वर्षानुवर्षे दौंडकरांना विविध पक्षांनी मंत्रिपदाचे फक्त गाजरच दाखविले आहे. आणि तालुक्याला आता एक मोठी संधी चालून आलेली असताना जर भाजप नेतृत्वाने यावेळी दौंडची दखल घेतली नाही तर मग मात्र याचा फटका हा जीवाचे रान करून भाजप पक्ष वाढवत असलेल्या येथील तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते नेतेमंडळीपर्यंत बसल्याशिवाय राहणार नाही हे कटू सत्य आहे.

दौंडची जनता ही गेली अनेक वर्षे ‘कूल’ घराण्यावर विश्वास ठेऊन त्यांना निवडून देत आली आहे. त्यामुळेच कै.सुभाष आण्णा कूल यांचे वडील बाबुराव कूल यांना सर्वात अगोदर सभापती म्हणून या जनतेने निवडून दिले होते. त्यानंतर आमदार म्हणून त्यांचे पुत्र आणि दिवंगत आमदार कै.सुभाष आण्णा कूल यांना सलग दोनवेळा निवडून दिले तर त्यांच्या आकास्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती रंजनाताई कूल यांना आणि आता दोन वेळेस विद्यमान आमदार ‘राहुल कूल’ यांना निवडून देण्यात दौंडकरांनी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. त्यामुळे दौंडकरांचे प्रेम आणि विश्वास हे ‘कूल’ कुटीबीयांवर आजपर्यंत कायम असल्याचे स्पष्ट आहे.

मात्र एवढे करूनही जर यावेळी आमदार ‘राहुल कूल’ यांना दिलेगेलेले आश्वासन भाजप ने पाळले नाही आणि जर आमदार राहुल कूल मंत्रिपद मिळाले नाही तर मात्र या जनतेचा सहनशीलतेचा बांध तुटल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपला यापुढे त्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो ज्या अडचणी राष्ट्रवादीला येथे आल्या होत्या.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला शह देऊन पवारांच्या लाटेतही भाजप च्या चिन्हावर निवडून आलेले आमदार राहुल कूल यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला रोखायचे असेल तर या नविन उमद्या नेतृत्वाला यावेळी संधी देऊन दौंडला मंत्रिपद द्यावेच लागेल अन्यथा अख्खा पुणे जिल्हा जिथे भाजपच्या हातातून गेला तिथे फक्त दौंड तालुकाच ‘का’ तरला याचे उत्तर आगामी काळात भाजपला मिळू शकते.