रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीसाठी ‛केडगावचे’ तरुण ठरले ‛देवदूत’, वेळीच मदत मिळाली नसती तर..

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीचे केडगावमधील तरुणांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहेत. रेल्वेतून पडल्यानंतर त्या व्यक्तीचा एक पाय मोडून डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे या व्यक्तीला वेळीच मदत मिळाली नसती तर त्याचे प्राण वाचणे कठीण होते. मात्र ऐनवेळी केडगाव येथील तरुण त्या जखमीसाठी देवदूत बनून आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेतून पडलेल्या जखमीचे नाव दिनेश नलप्पा गुलपागे असे असून ते सोलापूर येथील रहिवासी आहेत. ते आपल्या कामानिमित्त सोलापुरवरुन मुंबईकडे रेल्वेने प्रवास करत होते. प्रवास करत आसताना पहाटेच्या सुमारास ते केडगाव जवळ रेल्वेतून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणावर मार लागला तर डाव्या पायाला फ्रॅक्चर होऊन इतर ठिकाणीही गंभीर इजा झाली. जखमी अवस्थेत ते गणेश अटक यांच्या घरासमोर सरपटत येऊन मदततीसाठी आवाज देऊ लागले.

पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गणेश अटक यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता त्यांना ही व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी त्वरित केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांना याबाबत कळविले. जगताप यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले तसेच ही बाब पोलीस हवालदार गाडेकर यांना कळविली. या नंतर या सर्वांनी त्वरित आकाश नेवसे यांची अँबुलेन्स बोलवुन जखमीला डॉ. विशाल खळदकर यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पहाटेच्या वेळ असतानाही डॉ. विशाल खळदकर यांनी गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर त्वरित उपचार सुरू केले तर ग्राप.सदस्य नितीन जगताप यांनी त्या व्यक्तीची माहिती जमविण्यास सुरुवात केली. ही व्यक्ती सोलापूरची असल्याची माहिती मिळाल्यानंतर जगताप यांनी त्यांच्या नातेवाईकांना शोधून त्यांना या घटनेची माहिती दिली.

हे सर्व एका अज्ञात व्यक्तीसाठी सुरू होते. ती व्यक्ती कोण आहे, कुठली आहे, कोणत्या जातिधर्माची आहे हे न पाहता त्याचे प्राण कसे वाचवता येतील याचा प्रयत्न सर्वजण करत असल्याचे पहायला मिळाले. जखमी व्यक्तीवर शस्त्रक्रिया आणि उपचार करून तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर डॉ.खळदकर यांनी त्या रुग्णास त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली केले.

या सर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, निरामय हॉस्पिटल चे डॉ. विशाल खळदकर, गणेश अटक, किरन नालकर, तेजस ढेंभे, पोलीस हवालदार बी.ए. गाडेकर, रेल्वे चे (आर.पी.एफ.) सहा.फौजदार सुर्वे, (जी.आर.पी) ओ.एस. कुबरे, संतोष लोखंडे यांचे सहकार्य लाभल्याने त्या जखमी व्यक्तीचे प्राण वाचविण्यास यश आले.