मिरज येथील जगप्रसीध्द शारदीय नवरात्र संगीत महोत्सव 15 ऑक्टोबर पासून

सुधीर गोखले

सांगली : गेली ६८ वर्षे सुरु असलेला आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असलेला मिरज मधील शारदीय नवरात्र महोत्सव यंदा दि. १५ ऑक्टोबर पासून सुरु होत असल्याची माहिती नवरात्र उत्सव समितीने दिली आहे. या नवरात्र संगीत महोत्सवात गायक, गायिका आणि वादकांचा महामेळा भरत असतो. प्रत्येक कलाकार आपली सेवा श्री अंबाबाई चरणी अर्पण करण्यासाठी आतुर असतो. मिरज मधील श्री अंबाबाई चे हे मंदिर आदिलशाही काळातील असल्याचे सांगितले जाते.

तर या नवरात्र संगीत महोत्सवाची ख्याती साऱ्या देशभर पसरली असून आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिग्गज कलाकारांनी या संगीत नवरात्र महोत्सवात आपली सेवा अर्पण केली आहे. यंदाही दि १५ ऑक्टोबरपासून मिरज सांगलीतील रसिक प्रेक्षकांना एक अनोखा संगीत सोहळा अनुभवयाला मिळणार आहे.

दि १५ ऑक्टोबर रोजी राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते या नवरात्र संगीत महोत्सवाचे उदघाटन संपन्न होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी, आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त सुनील पवार, पृथ्वीराज पवार हे प्रमुख पाहुणे असतील.

संगीतकार कै. राम कदम पुरस्कार यंदा प्रख्यात पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना जाहीर
मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे संगीतकार राम कदम. मराठी चित्रपट सृष्टीमधील एक काळ त्यांच्या संगीताने अजरामर केला. कित्येक गाजलेल्या मराठमोळ्या लावण्या या त्यांनी संगीतबद्ध केल्या. अशा कलेच्या उपासक असणाऱ्या कै.राम कदम यांच्या नावाने त्यांचे चिरंजीव विजय कदम यांनी पुरस्काराची घोषणा केली. दर वर्षी हा पुरस्कार शारदीय नवरात्र संगीत महोत्सवात वितरित केला जातो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल.

अनेक दिग्गज कलाकारांची यंदाही हजेरी
येत्या १५ तारखेपासून सुरु होणार शारदीय नवरात्र संगीत महोत्सवात यंदाही राज्यातीलच नाही तर देशभरातील अनेक दिग्गज कलाकार आपली सेवा अर्पण करतील यामध्ये प्रामुख्याने इंद्राणी मुखर्जी, सावनी रवींद्र, मुक्ता रास्ते आणि मिरजेचे सुपुत्र प्रसिद्ध गोंधळी बजरंग मोहिते यांचा समावेश आहे.
प्रसिद्ध तबलावादक अबान मेस्त्री पुरस्कार वितरण
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला तबलावादक डॉ. अबांन मेस्त्री यांच्या नावे हा पुरस्कार मुंबई च्या प्रसिद्ध सोलो तबला वादक मुक्ता रास्ते यांना देण्यात येणार आहे. मिरजेच्या तहसीलदार डॉ. सौ.अपर्णा मोरे धुमाळ आणि ज़िल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल.
संगीत सेवा पुरस्कार वितरण
यंदा शारदीय नवरात्र संगीत मोहोत्सवामध्ये संगीत सेवेसाठी वाहून घेतलेल्या मिरजेच्या बजरंग मोहिते गोंधळी यांना संगीत सेवा पुरस्काराने गौरवण्यात येईल. काँग्रेस चे जेष्ठ नेते आणि गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार बजरंग मोहिते गोंधळी स्वीकारणार आहेत तर कार्यक्रमाची सांगता कौस्तुभ देशपांडे यांच्या प्रसिद्ध संगीत रजनीने होईल अशी माहिती या नवरात्र संगीत महोत्सवाचे अध्यक्ष मधुकर पाटील मळणगावकर, बाळासाहेब मिरजकर, संभाजी भोसले, विनायक गुरव, मजीद सतारमेकर यांनी दिली.