दौंड : देशात स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गायले जातात मात्र अनेक ठिकाणी बहिणींची नावे ७/१२ वर असतानाही बहिणींना जमिनीत हिस्सा दिला जात नसल्याची प्रकरने घडत असतात. असाच काहीसा प्रकार वाखारी (ता.दौंड) येथील पीर देवस्थान जमिनीमध्ये घडत आहे. या शेत जमिनीमध्ये तक्रादार शकीला सय्यद व त्यांसोबत असणाऱ्या त्यांच्या बहिणींची ७/१२ सदरी वहीवाटदार म्हणून नोंद आहे. मात्र या बहिणींना या शेत जमिनीमध्ये येण्यास अटकाव करून येथे पिके घेण्यास मनाई केली असल्याने आता तक्रादार शकीला सय्यद यांनी या संपूर्ण जमिनीवर स्टे आणण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही जमीन वक्फ बोर्डच्या ताब्यात असताना अजूनही यातील ७/१२ वर हक्क सांगणारे महाभाग याचे लाभार्थी कसे हा मोठा संशोधणाचा विषय असून या संपूर्ण प्रक्रियेत ही बाब आता उघड होण्याच्या मार्गावर आहे.
त्यांच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, देवस्थान जमिनीच्या ७/१२ वर वहीवाटदार म्हणून बहिणींची नावे असताना आणि त्या बहिणींची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असतानाही त्यांच्या भावांनी ताकदीच्या जोरावर बहिणींच्या वाट्याला येणाऱ्या जमीनिसह संपूर्ण क्षेत्र आपल्या ताब्यात घेऊन त्यामध्ये वर्षानुवर्षे पिके घेऊन मोठा आर्थिक फायदा मिळवत आले आहेत. या सर्व अन्याया विरोधात आता बहिणींनी थेट माननीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारी केली असून लवकरच माननीय न्यायालयात या सर्व जमिनीवर स्टे मिळावा आणि सर्व बहिणींना जोपर्यंत त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत या क्षेत्रामध्ये कुणालाही कसल्याही प्रकारची शेती अथवा वहिवाट करण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी याचिका माननीय न्यायालयात या बहिणी करणार असल्याचे यातील तक्रारदार यांनी सांगितले आहे.
बहिणींच्या वाट्याला येणाऱ्या या जमिनींमधील घेतलेल्या पिकांचा कोणताही मोबदला अद्यापपर्यंत या भावांनी आपल्या बहिणींना दिला नाही आणि या जमिनीत बहिणींची वहीवाटदार म्हणून नावे असताना तेथे बहिणींना पिके घेण्यास आणि ताबा, वहीवाट करण्यास कायम विरोध करून दमदाटी केली असल्याचे मुख्य अर्जदार शकीला सय्यद यांनी बोलताना सांगितले आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शकीला सय्यद यांनी आता या संपूर्ण जमिनीवर माननीय न्यायालयाकडून मनाई बंदी आदेश होण्याची आणि जोपर्यंत माननीय न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत संपूर्ण क्षेत्रावर स्टे मिळून संपूर्ण क्षेत्र हे संबंधित शासकीय विभागाच्या ताब्यात रहावे अशी याचिका दाखल करत असल्याचे सांगितले आहे.
वाखारी येथील पीर देवस्थान क्षेत्र हे कायम या ना त्या कारणाने वादाचे केंद्रबिंदू बनत आले आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्व बहिणींना न्याय मिळत नाही आणि त्यांना या जमिनीत पिके घेऊ दिली जात नाही तो पर्यंत हे क्षेत्र संबंधित शासकीय विभागाने आपल्या ताब्यात घ्यावे अशी मागणी शकीला सय्यद यांनी केली असून यातील सर्व जमीन आणि त्याचा आर्थिक मोबदला घेणाऱ्या आणि शासनाला अंधारात ठेवणाऱ्या लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.