‛वरवंड’ येथील ‛खूनाचा व्हिडीओ’ ठरला आरोपींचा ‛कर्दनकाळ’ | दीड वर्षापूर्वी खून करून गडी फिरत होते बिनधास्त, पोलिसांनाही संशय आल्याने सुरू होता तपास.. अखेर ‛ती’ एक ‛चूक’ नडली अण हातात ‛बेडी’ पडली

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे भंडारी यांचे सासरे गांधी यांच्या खुनाला तब्बल दीड वर्षांनी वाचा फुटली आहे. ही घटना उघडकीस आणण्यात यवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांच्या टीमचा मोठा वाटा असून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर या खूनाला वाचा फोडण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, ए.एस.आय हनुमंत जाधव, पोलीस हवालदार नितीन भोर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुपेकर यांच्या टीमला यश आले आहे. तब्बल दीड वर्षांपूर्वी घडलेल्या खूनाला वाचा फोडत आरोपींना अटक करण्यात आल्याने यवत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संपूर्ण प्रकरणात खून करत असताना तयार करण्यात आलेला व्हिडिओ ही मोठा पुरावा ठरला आहे.

अपघाती मृत्यू ते खून असा हा घटनाक्रम समोर आल्याने वरवंडच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. गांधी यांचा मृत्यू पाय घसरून पडून झाल्याचे सांगितले जात असले तरी हा खुन असावा असा संशय पोलिसांना येत होता त्यामुळे पोलिसांकडून त्या मार्गाने तपास सुरू असतानाच त्यांना एक व्हिडिओ प्राप्त झाला आणि संपूर्ण प्रकार समोर आला.

आरोपी राकेश भंडारी याच्या वहिनेचे वडील हे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इस्टेटमध्ये वहिनीला हिस्सा देणार नाहीत, तू काहीतरी चांगला कामधंदा कर टूकारांसारखा फिरत जाऊ नकोस, माझा जावई कमावतो आणि तू नुसता फिरत असतो हे बरोबर नाही असे गांधी राकेशला म्हणायचे. त्यामुळे राकेश भंडारी आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या वहिनीच्या वडिलांना संपवायचे ठरवले आणि वरवंड येथील फॉरेस्ट जमिनीत घेऊन जाऊन सर्वांनी मिळून त्यांचा खून केला होता. मात्र हा खून करताना त्याचा एक व्हिडिओही बनविण्यात आला आणि तोच व्हिडीओ आरोपींसाठी कर्दनकाळ ठरला आहे.

आरोपी राकेश भंडारी, अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले (सर्व रा.वरंवड ता.दौड जि.पुणे) यांच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांनी मिळून दि. 27/03/2022 रोजी राकेश भंडारी, याने वरील कारणांमुळे आपली वहिनी सौ. सपना राहुल भंडारी यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी यांना अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले यांची मदत घेवुन दिनांक वरंवड गावातील फॅारेस्ट जमीनीमध्ये घेऊन जाऊन त्यांचा गळा दाबुन खुन केला व पुरावा नष्ट करण्यासाठी ते घरामध्ये पाय घसरून पडुन मयत झाले असे सांगुन त्यांचा अंत्यविधी केला होता.

पण म्हणतात ना की आरोपी कितीही शातीर असला तरी तो काही ना काही पुरावा मागे सोडतोच, आणि प्रकरणातही तसेच झाले. आरोपींनी खून करत असताना एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडीओबाबत वरील यवत यवत, पाटस पोलिसांना खबऱ्या मार्फत भनक लागली होती. त्यांनतर मात्र पोलीस या सर्व आरोपींच्या मागावर होते, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. यवत पोलिसांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर टाकली होती त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनीही या तापसबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते.

ही घटना उघडकीस आणण्यात यवत आणि पाटस पोलिसांचा मोठा वाटा असून एखाद्या सीरियल किंवा चित्रपटात दाखवतात अशी खरीखुरी कामगिरी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुकही होत आहे.