अहमदनगर : गुन्हा कितीही गंभीर असू देत, पण त्या गुन्ह्याच्या तपासात सातत्य ठेवल्यास त्याची उकल होतेच. कोतवाली पोलिसांच्या कामगिरीत अलीकडे यामुळेच सुधारणा दिसते आहे. नगर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डाॅ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांनी यश आले आहे. सफाईदारपणे केलेली या चोरीची उकलीमध्ये 33 लाखांचे 55 तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात राहुरीतील दीपक सर्जेराव पवार (वय 32, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) याला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश आोला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाॅ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी 23 आणि 28 आॅक्टोबरच्या दरम्यान चोरी झाली होती. डाॅ. फिरोदिया यांच्या घराच्या कपाटातील 55 तोळे सोन्याचे दागिने, हिरे, पुष्कराज, मोती आणि पाचू असे दागिने चोरीला गेले होते. याशिवाय एक घड्याळ आणि 17 हजार रुपयांचा रोख रक्कम, असा मोठा मुद्देमाल चोराने चोरून नेला होता. डाॅ. ऋषभ फिरोदिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकाऱ्यांसह चोरीच्या घटनास्थळी 4 ते 5 वेळा तपासणी केली. चोरांनी सफाईदारपणे चोरी केली होती. त्यामुळे तपासाचे आव्हान होते. तपास सुरू झाला पण सुरूवातीला धागेदोरे हाती लागत नव्हते. परंतु तपासात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहकाऱ्यांसह सातत्य ठेवले. सीसीटीव्हीची तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली.
तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शन घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला तपासाच्या पुढच्या सूचना केल्या. यानंतर पथकाने तपासात वेग घेतला आणि राहुरीतील दीपक पवार भोवती सापळा आवळला. दीपक पवार याला राहुरी बसस्थानक परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपक पवार सुरूवातीला काहीच सांगत नव्हता. दिशाभूल करत होता. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता चोरी केलेले बरेच सोने हे घरी असून काही सोने सेलू परभणी येथील 2 सराफाला विकाल्याचे त्याने कोतवाली पोलिसांना सांगितले. कोतवाली पोलिसांनी परभणी येथील सराफ आणि दीपक याच्या घरातून सुमारे 33 लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने एकूण वजन 828 ग्रॅम निव्वळ सोन्याचे 550 ग्रॅम जप्त केले आहे. दीपक पवार याला न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, पोलीस जवान तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, लोणी पोलीस स्टेशन चे रविंद्र मेढे दक्षिण मोबाइल सेल चे राहुल गुंड हे पथक तपासात सहभागी झाले होते.
70 ठिकाणी दीडशे सीसीटीव्हीची तपासणी –
दीपक पवार याने सराईतपणे चोरी केली होती. या चोरीची उकल करण्याचे आव्हान होते. तांत्रिक तपासात सुरूवातीला धागेदोरे मिळत नव्हते. परंतु बारकाईने तपास केल्यावर 3 सेकंदा चे सीसीटीव्ही फुतेज मुळे दीपक पवार भोवती संशय बळावला. यासाठी कोतवाली पोलिसांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरीतील 70 ठिकाणचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासले. यानंतर दीपक पवार याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. दीपक पवार हा कुत्रा विकत घेण्यासाठी आला आणि त्याचवेळी कोतवाली पोलिसांनी त्याला राहुरी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
दीपकच्या शोधात बारा जणांकडे तपासणी –
दीपक पवार याने डाॅ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरात दोन वेळा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला घड्याळ आणि रोख रक्कम चोरले होते. त्यानंतर दुसऱ्यावेळी दागिन्यांची चोरी केली. कपाटाचे लाॅकर दीपकला उघडत नव्हते. जोरात आवाज होईल म्हणून, दीपक हा कपाट सावकाश उघडत होता. यासाठी त्याने अडीच तास घेतले. लाॅकर उघडल्यानंतर त्यातील दागिने घेऊन दीपक याने पुन्हा कुलूप लावून तसेच ठेवले. सीसीटीव्ही फुटेज चे वर्णनावरून दीपकच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांनी त्याच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या 12 जणांची चौकशी केली. शेवटी दीपक पोलिसांच्या कचाट्यात सापडला.
पोलीस अधीक्षकांकडून 35,000 रुपये बक्षिसाची घोषणा –
कोतवाली पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हा उघडकीस आणलेल्या टीमला देण्यात येत असलेले सर्वाधिक 35 हजार रुपये बक्षीस जाहीर केले.