दौंड तालुक्यात हॉटेल समोरील गाड्यांच्या काचा फोडून चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद, 11 गुन्हे उघडकीस

दौंड : पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये हॉटेल समोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार चाकी गाड्यांच्या काचा फोडून बॅग, ऐवजी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

मागील महिन्यात दिनांक ०८/१०/२०२३ रोजी दुपारी ०३:०० ते ०४:४५ दरम्यान वाखारी (ता. दौड जि. पुणे) गावचे हद्दीत हॉटेल निर्माण समोरून स्वीप्ट डिझायर कार नंबर एम.एच २४ ए.बी.२०५ पार्क करून लावलेली असताना गाडीच्या पाठीमागील काच फोडून गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या आईचे पर्स मधील मोबाईल आणि रोख रक्कम असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरी करून चोरून नेला होता. त्यानंतर यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली.

पोलीस तपास हा करत असताना त्यांनी पुणे सोलापूर हायवे रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यास सुरुवात केली तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार करन मोहन चव्हाण (रा.कुंभारी सोलापूर सध्या रा.ठाणे किशननगर सेक्टर १२) याने केले असल्याचे समजले. त्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन कुंभारी जिल्हा सोलापूर येथून संशयित आरोपी मोहन चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपी करन चव्हाण याने यवत पोलीस स्टेशन, दौंड, सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलचे पार्किंग मधून चार चाकीचे वाहनांची काच फोडून विविध गाड्यांमधील ११ बॅगा चोरून नेल्या असल्याचे निष्पन्न झाले असून दोन लाख पंचावन्न हजार रूपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख वळसंग पोलीस स्टेशन पोलीस हवालदार निलेश कदम,
पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड,
पोलीस हवालदार राजू मोमीन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार अक्षय यादव,
पोलीस हवालदार महेंद्र चांदणे, पोलीस हवालदार रामदास जगताप, पोलीस शिपाई मारुती बराते, पोलीस शिपाई सुनील कोळी सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळासाहेब गाडेकर करीत आहे.