टेम्पो चालकाने 2 स्विफ्ट कार, 1 दुचाकीला धडक देऊन 14 जणांना जखमी केले, महामार्गावर टेम्पो पलटी करून महाशय मात्र पळून गेले

दौंड / उरुळी कांचन : दौंड तालुक्यातील बोरी भडक येथे दि. 25/06/23 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर एका भरधाव टेम्पो चालकाने 2 स्विफ्ट कार आणि एका दुचाकीला उडवत सुमारे 14 जणांना जखमी केले. या भीषण अपघातानंतर हा टेम्पोही महामार्गावरच पलटी झाला मात्र यातील वाहन चालक मदत करण्यास आलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला आहे.

पहा व्हिडीओ… असा झाला अपघात

या अपघाताची फिर्याद रोहीत बबनराव गायकवाड (वय 38 वर्ष व्यवसाय हेअर स्टायलीस रा. वाघोली, पुणे) यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून टाटा कंपनीचा 1109 ईएक्स 2 मॉडेलच्या टॅम्पोवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये एका स्विफ्ट मधील रोहीत बबनराव गायकवाड, सोनाली रोहीत गायकवाड, हर्ष रोहीत गायकवाड, छबी रोहीत गायकवाड, या चार जनांसह सुमारे चौदाजण जखमी झाले आहेत.

मिळालेली माहितीनुसार बोरीभडक चंदनवाडी (ता.दौड जि.पुणे) गावच्या हद्दीत असणाऱ्या टायर फाटा, झुम लॉज समोर टाटा कंपनीचा 1109 ईएक्स 2 मॉडेलचा टेम्पो हा त्यावरील चालकाने भरधाव वेगात पुणे बाजुकडे जात असताना डिव्हायडर तोडुन राँग साईटला येवुन स्वीप्ट कार नं एम.एच. 12 क्यु.टी 5843 तसेच स्वीप्ट कार नं एम.एच. 14 जी.एच. 3785 तसेच बजाज डिस्कव्हर मोटार सायकल नं एम.एच 42 जी 506 या गाड्यांना धडक देवुन तिन्ही वाहनांचे नुकसान केले. या अपघातामध्ये 14 जणांना किरकोळ, गंभीर स्वरूपाची दुखापत करूनही सदर वाहन चालकाने यवत पोलीस ठाण्यात अपघाताची कोणतीही खबर न देता पलटी झालेला टेम्पो रस्त्यात सोडून पळुन गेला. सदर अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.