दौंड : दौंड तालुक्यातील यवत या याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, मानवतेला काळिमा फासणारी आणि मनाला चीड आणणारी अशीच आहे. यातील आरोपीवर मकोका सारखी कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
यवत येथे महाराजांच्या मूर्ती विटंबनेची घटना उघडकीस येताच हिंदू, मुस्लिम समाजाने या घटनेचा जाहीर निषेध करत त्याच दिवशी सकाळी निषेध सभा घेतली. यामध्ये हिंदू, मुस्लिम समाजाच्या वक्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या घटनेत एका दारुड्या मुस्लिम तरुणाचा हात असल्याचे समोर येत असल्याने त्यावर कठोर कारवाई करावी, त्याला यवतमधून कायमचे हाकलून द्यावे, त्या नालायकाचा आणि संपूर्ण मुस्लिम समाजाचा काहीही संबंध नाही त्यामुळे त्या विकृत तरुणामुळे संपूर्ण समाजाला दोषी धरू नये अशीही वक्तव्ये केली गेली. कारण पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारे स्थानिक हिंदू-मुस्लिम बांधव या घटनेमुळे व्यथित झाले. करतय एक आणि भोगावे लागते संपूर्ण समाजाला अशी काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली.

यावेळी संपूर्ण मुस्लिम समाजाने या घटनेचा निषेध नोंदवत यातील आरोपीला कडक आणि कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भाषणातून पोलिसांना केली होती आणि तसे पत्रसुद्धा पोलिस स्टेशनला देण्यात आले. हे सर्व होत असताना घटनेच्या दिवशी सर्व हिंदू, मुस्लिम व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदवला होता तर बाहेरून येउन काहीजण गावातील वातावरण दूषित करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गावकऱ्यांना समजल्यानंतर गावातील जेष्ठांनी काहींना समोर बोलवून अनुचित प्रकार घडू नये म्हणून तंबीही दिली होती.
सायंकाळची सभा झाली आणि वातावरण तप्त बनले – सकाळी झालेल्या निषेध सभेनंतर सायंकाळी पुन्हा निषेध मोर्चा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मुस्लिमांनी येऊ नये, मुस्लिम जर या सभेत दिसले तर त्यांना मारहाण केली जाईल असे मेसेज सोशल मिडीया ग्रुपवर दुपारपासून फिरविण्यात येत होते. त्यामुळे या सभेत जातीवाचक, चिथावणीखोर वक्तव्ये होऊन वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे मुस्लिम समाजाने या सभेत येऊ नये असे काही शांतताप्रिय ग्रामस्थांकडून मुस्लिमांना सांगण्यात आल्याने ते या सभेपासून दूर राहिले. मात्र जात, धर्म पाहून जातीवाद करणारे महाभाग हे अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार यांच्यामधेही त्यांची जात, धर्म पाहत असल्याने आमच्या सभांमध्ये मुस्लिमांनी सामिल होऊ नये आणि सामिल झाले तर त्यांना बाहेर काढण्यात येईल असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले होते आणि सभेठिकाणी तसा प्रयत्नही केला गेला. सभेठिकाणी मुस्लिम जातीच्या पत्रकारांनीसुद्धा थांबू नये म्हणून काहींनी मुस्लिम जातीच्या असणाऱ्या पत्रकारांना तेथून निघून जाण्याबाबत सांगितले. हे होत असताना स्वतःला पत्रकार म्हणवणारे काही महाभाग मात्र गालातल्या गालात हसत होते तर एकजण दुसऱ्याच्या कानात घडलेली घटना हसून सांगत असल्याचे अनेकांनी पाहिले. दुसरी गोष्ट येथे प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे वयक्तीत असलेला व्यवसाईक, आर्थिक किंवा राजकीय वाद येथे उफाळून येत होता आणि आता बोलण्याची संधी आहे त्यामुळे अनेकांनी यात वयक्तिक हेवेदावे खातर ज्यांचा या प्रकरणात कसलाच संबंध नाही त्यांनासुद्धा यात ओढून त्यांना आणि त्यांच्या जाती, धर्माला सुद्धा शिव्यांची लाखोली वाहिली जी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओमधून सर्वांनी पहायला मिळाली.
आपण प्रथम भारतीय असल्याचा काहींना विसर – जातीवाद, धर्मद्वेष नसनसांमध्ये भिनलेले काहीजण मात्र हे विसरतात की अगोदर आपण भारतीय आहोत आणि नंतर आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे आहोत. त्यामुळे कृत्य करणारा कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याची ती स्वतःची मानसिक विकृती असते त्यास संपूर्ण समाज दोषी असू शकत नाही हे अनेकवेळा सिद्धही झाले आहे.
सोशल मिडिया, अनधिकृत युट्युब चॅनेलनी आगीत तेल ओतण्याचे काम केले – यवत येथे सायंकाळी झालेली निषेध मोर्चा सभा ही बाहेरून आलेले शेकडो युवक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झाली. तेथे काय बोलले जात आहे आणि काय चिथावणी दिली जात आहे याचे संपूर्ण चित्रण काहींनी आपल्या मोबाईलमध्ये करून त्याचे आहे तसे संपूर्ण प्रसारण आपल्या खाजगी युट्युब चॅनेल, फेसबुक पेजवर केल्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले गेले आहे. पत्रकारितेमध्ये युट्युब चॅनेल, फेसबुक पेज यांना मान्यता नाही. RNI प्रिंट आणि MIB सटेलाईट टीव्ही चॅनेल यांच्या व्यतिरिक्त अजून या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ला भारत सरकारकडून अधिकृत पत्रकारितेची मान्यता दिली गेली नाही. मात्र तरीही अनेकांनी स्वतःचे खाजगी युट्युब चॅनेल, न्यूज पोर्टल आणि फेसबुक पेज काढून हे आमचे चॅनेल आहेत आणि आम्ही पत्रकार आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न होत असतो मात्र ते तसे नाही तर ते फक्त सोशल मिडिया आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या सदनेमध्ये मोडतात पत्रकार म्हणून मान्यता नाही हे अजून अनेकांना माहित नाही. पत्रकाराचे काम सामाजिक एकी अबाधित ठेवणे, सामाजिक सलोखा जपणे आणि जातीवाचक विधाने, चिथावणीखोर, भडक वक्तव्ये प्रसारित न करता फक्त घटनेची पार्श्वभूमी समोर आणणे इतके असते. पत्रकारांना आपल्या बातमीतून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, सामाजिक स्थर्य बिघडणार नाही याचे भाण ठेऊन बातमीदारी करावी लागते. येथे मात्र पत्रकारितेची कोणतीच मूल्ये जपली गेली नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून भडक, चिथावणीखोर विधाने प्रसारित करण्यात येउन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
समाज दोषी नाही तर वयक्तिक मनोवृत्ती दोषी आहे – मागील महिन्यातच पुण्यात अश्याच दोन घटना घडल्या. अनेक अधिकृत वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीनुसार, पहिली घटना होती पुण्यातील शिवश्रुष्टि गेटवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीची.

अमोल कुलकर्णी नामक व्यक्तीने हे कृत्य केले होते. काही शिवप्रेमिंनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत संपूर्ण समाज दोषी नव्हता तर तो विकृत अमोल कुलकर्णी हा दोषी होता, कारण त्याने त्याच्या विकृतिमधून हे कृत्य केले होते आणि या घटनेसाठी त्याचा संपूर्ण समाज दोषी होऊ शकत नाही तर त्याची स्वतःची विकृत मानसिकता यास जबाबदार आहे हेही तितकेच खरे.

त्याच महिन्यातील दुसरी घटना पुणे रेल्वेस्टेशन समोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासोबत घडली. एका माथेफिरू तरुणाने हातात कोयता घेऊन पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. सुरज शुक्ला नामक माथेफिरू तरुणाने हे कृत्य केले होते. या तरुणाला पुणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.

राज्यात अश्या अनेक घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत ज्यामध्ये काही माथेफिरू अशी कृत्ये करत राहतात. मग त्यामध्ये मशिदीला स्फ़ोटके लावून ती उडवून देण्याचा प्रयत्न केला गेला असो वा महामानवांच्या मूर्ती, पुतळ्यांची विटंबना केली गेली असो हे सर्व नीच वृत्ती आणि क्रूर मानसिकतेचे प्रतीक आहे आणि अश्या समाज विघातक नीच वृत्तीला मकोका आणि विविध कलमान्वये कठोरात कठोर शिक्षा होने ही काळाची गरज बनली आहे.