भीमा पाटस कारखान्यावरील आंदोलनाला राजकीय आखाड्याचे स्वरूप | शब्द देऊनही आंदोलनाची घाई..! सभासद, नागरिकांचा संशय बळावला

दौंड : दि.28 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये कामगारांच्या वतीने अधिकृत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, आमची आणि कारखाना संचालक मंडळाची चर्चा योग्य दिशेने सुरु असून त्यातून चांगला मार्ग निघाला आहे असे जाहीर केले. तसेच निवृत्त कामगार आणि सेवेतील कामगारांच्या देणी विषयक प्रश्न 15 दिवसांत मार्गी लावले जाणार असल्याचे जाहीर सांगितले. मात्र या ठिकाणी काहींनी येऊन राजकीय भाषणे ठोकण्यास सुरुवात केली असून त्यांनी आत्तापर्यंत या कारखान्यावर किती ऊस घातला? कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले हेही एकदा सांगावे असा सवाल कारखाना सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

15 दिवसांत देणी देण्याचे जाहीर केले असताना 3 ऱ्या दिवशी आंदोलन का सुरु झाले..? भीमा पाटसचे चेअरमन राहुल कुल यांनी निवृत्त कामगारांच्या देणी देण्याबाबतची जी रक्कम भरायची राहिली आहे ती भरली की त्यांच्या देण्याचा मार्ग मोकळा होईल आणि 15 दिवसांत देणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल असेही जाहीर केले होते मात्र ही घोषणा होऊन 3 दिवस उलटत नाही तोच काही निवृत्त कामगारांनी कारखाना परिसरात आंदोलन सुरु केल्याने शब्द दिल्यानंतरही आत्ताच ही घाई का..? असा प्रश्न सभासद आणि नागरिकांना पडला असून या आंदोलनस्थळी एकाच व्यक्तीवर दर्जाहीन राजकीय टिका टिप्पण्या केल्या जात असल्याने या आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजून घेण्याचा काही राजकीय मंडळींचा डाव तर नाही ना अशी कुजबुज आता सभासद आणि नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

आंदोलनावर संशय का बळावला – भीमा पाटस कारखान्याच्या परिसरामध्ये सुरु असलेल्या निवृत्त कामगारांच्या आंदोलनादरम्यान काल माजी आमदार पुत्र आले आणि त्यांनी तेथे येऊन निवृत्त कामगार आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र हे पाठिंबा द्यायला येतात अण वडिल कारखाना जप्तीची भाषा करतात हे कितपत योग्य आहे अशी टिका कारखान्याच्या एका माजी संचालकांनी केली आहे. या आंदोलनाला आतून कुणाची फूस आहे हे आता लपलेलं नाही. निवृत्त कामगारांच्या मागण्या मान्य करून येत्या काळात त्यांची देणी दिली जाणार असल्याचे जाहीर करूनही आंदोलन होत आहे आणि ही मंडळी तेथे जाऊन भाषणे ठोकत आहेत ही तर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला खटाटोप आहे असा आरोप केला जात आहे.

सोशल मीडियावर खालच्या दर्जाच्या टिकेमुळे हे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय बळावला – कारखान्याचे चेअरमन आ. राहुल कुल यांनी भीमा पाटसच्या सर्वसाधारण सभेमध्ये कामगारांच्या प्रश्नांबाबत शब्द दिला तसेच अधिकृत कामगार संघटनेच्या वतीनेही याबाबत योग्य दिशेने चर्चा होऊन चांगला मार्ग निघाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरीही काहींनी 15 दिवस वाट न पाहता घाई गडबडीमध्ये आंदोलन सुरु केले. या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर बातम्या सदृश वाटणाऱ्या पोस्ट व्हायरल करून चेअरमन राहुल कुल यांच्यावर वयक्तिक जहरी आणि खालच्या दर्जाच्या टिकेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या आडून विधनसभेची तयारी केली जात असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन बदनामी सुरु.. हे आंदोलन राजकीय व्यक्तींनी हायजॅक करून त्याच्या माध्यमातून आ.राहुल कुल यांना नाहक बदनाम करण्याचा आणि वाट्टेल ते तथ्यहीन आरोप करण्याचा राजकीय आखाडा बनवला असल्याची चर्चाही नागरिक चौका चौकांत करू लागले आहेत. आजपर्यंत कामगारांच्या हक्काची लढाई वाटणाऱ्या आंदोलनाला आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या राजकीय आखाड्याचे स्वरूप आले असून कारखाना पुन्हा जोमाने सुरु होऊन शेतकऱ्यांच्या उसाला चांगला बाजारभाव मिळू लागला, खाजगी कारखाने आणि गुऱ्हाळ चालकांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबली हे काहींना अनेकांना रुचलेले दिसत नाही असे कारखान्याचे सभासद बोलत आहेत.