अख्तर काझी
दौंड शहरामध्ये मोकाट जनावरे व कुत्री यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे, याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा जनावरांच्या हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागल्याची घटना शहरामध्ये याआधी घडली आहे. त्यामुळे नगरपालिकेने शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री यांनी केली आहे. संघटनेच्यावतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, शहरातील अशा जनावरांचा बंदोबस्त होण्याबाबत नगरपालिकेला अनेक वेळा कळविण्यात आले आहे. परंतु नगरपालिका या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा बेवारस जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी दौंड नगरपालिकेकडून ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून जनावरे पकडली जात आहेत व ठराविक ठिकाणी सोडून सुद्धा दिली जात आहेत, परंतु अवघ्या 2-3 दिवसांमध्ये हिच कुत्री व जनावरे पुन्हा शहरातील गल्ल्यांमध्ये आढळून येतात. काही पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे येथील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळेस तर कुत्रि झुंडीने येऊन एखाद्यावर हल्ला करतात. या जनावरांच्या हल्ल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक,लहान मुले अनेक वेळा जखमी झालेले आहेत. अशा घटनांमध्ये जर एखाद्याला आपला जीव गमवावा लागला तर नगरपालिकेवर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपालिके कडे अनेक जागा उपलब्ध असताना अशा जागांमध्ये मोकाट जनावरांच्या कोंडवाड्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा अन्यथा येथील नागरिकांकडून व सामाजिक संघटनांकडून अशा प्रकारची कुत्री व जनावरे पकडून नगरपालिका कार्यालयात सोडण्यात येतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.