अख्तर काझी
दौंड : दौंड- पाटस रोडवरील गार फाटा येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवीत व कोयत्याने मारहाण करून रोकड लुटून नेल्याची घटना घडली. परंतु स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी या दरोडेखोरांना अवघ्या तीन ते चार तासातच मोठ्या शिताफीने जेरबंद करण्याची कारवाई केली.
याप्रकरणी पंपावरील कर्मचारी श्रीधर अशोक भागवत (रा.गार फाटा पाटस, दौंड) याने फिर्याद दिली असून धनंजय लक्ष्मीनारायण हगारे (रा. अंथुर्न, इंदापूर) व अनिकेत दादासो ढोपे (रा. शेळगाव, इंदापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.30 सप्टेंबर रोजी रात्री 11.20 च्या दरम्यान दोन दरोडेखोर नंबर नसलेल्या दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले, त्यांनी आपल्या दुचाकीत पेट्रोल भरले व पैसे देण्याच्या बहाण्याने ते पंपावरील कर्मचाऱ्याकडे आले. त्या दोघांपैकी एकाने आपल्या बॅगेतून पिस्तूल काढून फिर्यादीकडे रोखत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या आरोपीने त्याच्याकडील कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादीस मारहाण करीत फिर्यादीकडील पैशाची बॅग हिसकावून घेतली.
दरम्यान या कर्मचाऱ्यांना मारहाण करून दरोडेखोर पळण्याच्या प्रयत्नात असताना फिर्यादी यांनी दरडोखोरांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्यामुळे ते दुचाकी सोडून पळून गेले. पळून जात असताना त्यांच्याकडे असणारी बॅगही पंपावरच पडली. परंतु फिर्यादीकडून लुटलेले पैसे घेऊन ते गिरिम-एमआयडीसी रोडच्या डोंगराकडे पसार झाले. सदर घटनेची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची सविस्तर माहिती घेतली. दरोडेखोर ज्या दिशेने पळाले त्या परिसरात पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र अंधार असल्याने व दरोडेखोरांकडे प्राणघातक हत्यारे असल्याने पथकाने सावध भूमिका घेत व योग्य नियोजन करीत त्या परिसरात सापळा रचून शोध सुरू ठेवला.
त्यावेळी त्यांना परिसरामध्ये अंधारात दोघे संशयास्पदरित्या फिरताना आढळले. हे तेच दरोडेखोर आहेत याची खात्री करून पोलीस पथकाने झडप घालीत मोठ्या शिताफिने त्यांना जागेवरच जेरबंद केले. पुढील तपासासाठी त्यांना यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दोन्ही आरोपी सुशिक्षित असून कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे व त्यांच्याकडील असणारे पिस्तूल हे सुद्धा बनावट (सिगारेट लाइटर) असल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार असिफ शेख, विजय कांचन, पो. कॉ. धीरज जाधव तसेच यवत पोलीस स्टेशनचे पो. उप.निरीक्षक नागरगोजे, पो. हवा. गुरु गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.