दौंड : दौंड तालुक्यातील राहू येथे व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात जमीन नावावर करून घेत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ईश्वरसिह विरदसिह सिंधल (व्यवसाय मजुरी, रा.राहू ता.दौंड, मूळ राजस्थान) यांच्या फिर्यादिवरून यवत पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहु (ता.दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीमध्ये आरोपी गणेश नामदेव पिलाणे (रा. पिलाणवाडी राहु ता. दौंड. जि. पुणे) याने फिर्यादी यांच्या मुलीच्या लग्नासाठी हात उसने म्हणुन दिलेले 3 लाख रुपयांचे व्याजासह एकुण 7 लाख रुपयांची मागणी करून मुद्दल व व्याजाच्या पैशासाठी सतत तगदा लावला होता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांची राहु येथील (राहु-वाघोली रोड लगत) असलेली 4 गुंठे जमीन ही फिर्यादीची इच्छा नसताना 18 लाख रूपये किंमतीला आरोपिंनी ती जमीन त्यांच्या नावावर करून घेतली तसेच खरेदीखतामध्ये उल्लेख केलेले 7 लाख रुपयांचे चार चेक बाउंस करून तसेच उर्वरीत रक्कम व खरेदीखताचे कागदपत्र न देता त्यांची 4 गुंठे जमीन व्याजाच्या पैशामध्ये नावावर करून घेवुनफिर्यादी यांची वेळोवेळी फसवणुक करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.
तसेच गणेश पिलाणे याचा साथीदार गोकुळ आवाळे (रा कोरेगाव भिवर ता. दौंड जि.पुणे) याने देखील फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
यवत पोलिसांनी वरील दोन्ही आरोपिंवर फसवणूक, सावकारी अधि. 39 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोसई मदने करीत आहेत.