शेतीविषयक
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील केडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ज्ञानदेव महादेव गायकवाड हे सध्या आपल्या विशिष्ट प्रकारे केल्या गेलेल्या सेंद्रिय ऊस शेतीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्ञानदेव गायकवाड हे उच्चशिक्षित ग्रॅज्यूएट असून त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून ऊस शेतीसह विविध पालेभाज्या, तरकारीचे पीक घेऊन पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांना या सर्व कामात उच्चशिक्षित ग्रॅज्यूएट असलेले मोठे बंधू दिलीप गायकवाड यांचेही मोठे मार्गदर्शन लाभले आहे.
परिवाराची मोठी साथ अण यशस्वी वाटचालीला सुरुवात.. ज्ञानदेव गायकवाड यांनी त्यांचे मोठे बंधू एसिपी (ACP) रामचंद्र गायकवाड, दिलीप गायकवाड, लहान बंधू (पुणे शहर पोलीस) दत्तात्रय गायकवाड यांना आपल्याला माळरानावर सेंद्रिय सेंद्रिय शेती तसेच पाले भाज्या आणि तरकारी पिके घ्यायची असल्याचे आणि त्यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. यानंतर सर्व भावांनी आणि विशेष करून ACP रामचंद्र गायकवाड यांनी त्यांना यात सहकार्य करण्याचे ठरविले. माळरानात काळी माती भरून विहिरिंची खोली वाढविण्यात आली. त्यानंतर सर्व 13 एकर शेतीसाठी पाण्याचा तुटवडा आणि पिकांची गरज पाहून ठिबक तसेच उसासाठी पट्टा पद्धत आणि ड्रीप कॉक च्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. विविध पिके घेऊन ज्ञानदेव गायकवाड यांनी ऊस शेतीवर विशिष्ट लक्ष केंद्रित केले आणि पाहता पाहता या ऊस शेतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
रासायनिक खतांचा कमी वापर आणि सेंद्रिय शेतीचा फॉर्म्युल्या वापर.. केडगावचे माजी उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड यांनी मध्यंतरीच्या काळात गावगाड्याच्या राजकारणापासून थोडा वेळ काढत आपले संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केले होते. यातून त्यांनी प्रगत सेंद्रिय शेती आणि रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करून पिके घेण्याची पद्धत याचा अभ्यास केला. यातून त्यांनी विविध ठिकाणची माहिती गोळा करून एक प्रगत अशी ऊस शेती करण्याचा निर्णय घेतला. ऊस शेती साठी त्यांनी प्रथम 86032 या जातीच्या बेन्याची निवड केली. त्यानंतर शेतीची मशागत करून त्यामध्ये पट्टा पद्धत अमलात आणून त्यामध्ये ड्रीप कॉक चा वापर करून पाणी पोहचविण्याची विशिष्ट पद्धत अमलात आणली. या सर्व प्रक्रियेनंतर सेंद्रिय खत, कोंबड खत टाकून रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करण्यावर भर दिला. आज ज्ञानदेव गायकवाड यांचा 4 एकरातील 4 महिन्यांचा ऊस हा पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांचे लक्ष वेधत आहे. संपूर्ण तालुक्यातील विविध गावांचे शेतकरी त्यांची भेट घेऊन हिरव्यागार उसाचे आणि त्याच्या नियोजनाचे गमक त्यांच्याकडून माहितीकरून घेताना दिसत आहेत.