राहुरी येथील वकील दांपत्याच्या खुनाचा दौंड च्या वकिलांनी केला निषेध, कोर्ट कामकाजापासून आज वकील वर्ग राहिला अलीप्त

अख्तर काझी

दौंड : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावातील वकील राजाराम आढाव व वकील मनीषा आढाव या दांपत्याचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा दौंड तालुका ऍडवोकेट बार असोसिएशनने निषेध नोंदविला.व या घटनेच्या निषेधार्थ वकील वर्ग आजच्या कोर्टातील कामकाजापासून अलिप्त राहिला. वकील संघटने कडून मा. दिवाणी न्यायाधीश व स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयाला याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून नंतर त्यांचे निर्घृण खून करून, मृतदेह विहिरीत टाकण्यात आले आहे. या निर्घृण खुनाच्या घटनेचा निषेध म्हणून दौंड न्यायालयातील वकील सोमवार दि. 29 जानेवारी रोजी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत. वकील संरक्षण कायद्याबाबत महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत, परंतु अद्याप सरकारने कोणतेही सहकार्य केलेले नाही. अथवा याबाबत पुढाकारही घेतलेल्या नसून वकील वर्गाला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.