अख्तर काझी
दौंड : कोर्टमधील जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे, माझी कोर्टमध्ये ओळख आहे आणि माझी सेटिंग सुद्धा आहे त्यामुळे मी तुम्हाला स्वस्तामध्ये सोने विकत घेऊन देतो असे अमिष दाखवून येथील वकील सनी बलदोटा याने मित्र सज्जन काकडे यांची तब्बल 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. काकडे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी वकील सनी अजित बलदोटा याच्या विरोधात दि.26 डिसेंबर 2023 रोजी फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला मात्र तेव्हापासून अद्यापपर्यंत वकील सनी बलदोटा हा फरारच असल्याची माहिती फिर्यादी सज्जन काकडे यांनी दिली आहे.
दरम्यान सनी बलदोटा याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता परंतु आज दि.31 जाने रोजी बलदोटा याच्या वकिलाने याप्रकरणी सुनावणी होण्याआधीच तो अर्ज मागे घेतला असल्याची माहिती फिर्यादी काकडे यांनी दिली आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्या सनी बलदोटा यास पोलीसांनी अटक करावी अशी मागणी फिर्यादी यांच्याकडून केली जात आहे.
असे आहे प्रकरण पोलिसां
नी दिलेल्या माहितीनुसार दि.3 जून 2023 ते 19 जुलै 2023 दरम्यान फिर्यादींनी वकील सनी अजित बलदोटा यास वेळोवेळी पैसे दिले आहेत. फिर्यादी व वकील सनी बलदोटा यांची चांगली मैत्री होती, ते एकमेकांना आर्थिक मदत करीत असत. जून 2023 मध्ये सनी अजित बलदोटा फिर्यादी यांच्याकडे आला व म्हणाला की दौंड मधील कोर्टामध्ये जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे, माझे कोर्टा
मध्ये चांगले संबंध आहेत व माझी कोर्टामध्ये तशी सेटिंग सुद्धा आहे. मी बऱ्याच लोकांना सोने,
गाड्या तसेच इतर वस्तू स्वस्तामध्ये मिळवून दिल्या आहेत. मी सदर लिलावामधील 60 तोळे सोने 25 हजार रु. तोळ्याप्रमाणे तुम्हाला मिळवुन देतो, तुम्ही 15 लाख रुपयांची तजवीज करून ठेवा. लिलाव झालेली रीतसर पावती सुद्धा कोर्टामधून तुम्हाला मिळवून देतो, तुम्हाला कायदेशीर काहीही अडचण येणार नाही असे सनी अजित बलदोटा याने फिर्यादीस विश्वास दाखविल्याने फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीस 9 लाख 80 हजार रुपये त्याच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर पुन्हा 2 लाख 50 हजार रु. व 2 लाख 70 हजार रुपये नातलग व मित्रांकडून उसने घेऊन सनी बलदोटा याला फिर्यादी यांनी दिले आहेत.
फिर्यादी यांनी 19 जुलै 2023 पर्यंत तब्बल 15 लाख रुपये सनी अजित बलदोटा याला दिल्यानंतर सदर सोने लिलावाबाबत विचारणा केली असता, अद्याप लिलाव झालेला नाही, लवकरच लिलाव होणार आहे, लिलाव झाला की तुम्हाला सोने मिळवून देतो असे म्हणून सनी बलदोटा वेळ मारून न्यायचा. त्यामुळे फिर्यादी यांना शंका आल्याने त्यांनी सदर सोन्याच्या लिलावाबाबत माहिती घेतली असता त्यांना असे समजले की दौंड कोर्टामध्ये अशा प्रकारचा कोणताही लिलाव होत नाही. अशी माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी सनी बलदोटा याला भेटून सदरची हकीकत सांगितली व मला माझे पैसे परत करा नाहीतर मी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे असेही फिर्यादी यांनी बलदोटा याला सांगितले. त्यामुळे सनी बलदोटा याने फिर्यादी यांना पंधरा लाख रुपयांचा धनादेश दिला. फिर्यादी यांनी सदरचा धनादेश बलदोटा यांच्या बँकेमध्ये दाखविला असता त्या खात्यावर रक्कम नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वकील सनी बलदोटा यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
वकील सनी बलदोटा याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बारामती जिल्हा सत्र न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता परंतु या प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी होण्याआधीच त्याच्या वकिलाने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे.