दौंड मधील नियोजित बुद्ध विहाराचा विषय चिघळण्याच्या मार्गावर, 15 ऑगस्ट पासून धरणे आंदोलनाचा इशारा

अख्तर काझी

दौंड : शहरातील नियोजित बुद्ध विहाराचे बंद पडलेले बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे तसेच यासाठी स्थानिक समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी येथील दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. बुद्ध विहाराचे काम त्वरित सुरू न केल्यास 15 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही संघटनांनी नगरपालिकेला दिला आहे. नगरपालिकेला या मागणीबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष अमित सोनवणे, भीम वॉरियर्स संघटनेचे संस्थापक प्रमोद राणे रजपूत, ऑल इंडिया पॅंथर सेना पक्षाचे ता. अध्यक्ष सागर उबाळे, सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी तसेच भीम अनुयायी उपस्थित होते. उप मुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड नगर परिषदेमार्फत सन 2016 पासून बुद्ध विहार बांधण्याचे काम सुरू झाले असून मागील आठ वर्षापासून फक्त पायाभरणीचे काम करण्यात आले आहे. ते काम सुद्धा अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे. बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. दि.24 ऑगस्ट 2016 रोजीच्या शासनाच्या प्रपत्राद्वारे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयांचा निधी तसेच वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक निधी दौंड नगरपालिकेकडे वर्ग झाला असतानाही बुद्ध विहाराचे बांधकाम मात्र पायाभरणीच्या वर येताना दिसत नाही.

मागील काही महिन्यात या ठिकाणाहून बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजते आहे, त्यामुळे या घटनेकडे नगरपालिका जाणीवपूर्वक व जातीय द्वेष भावनेतून दुर्लक्ष करीत आहे असा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व घटनांचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. 

सदरचे रखडलेले बुद्ध विहाराचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे व काम सुरू असताना काही गैरप्रकार घडू नये व बुद्ध विहाराचे धार्मिक पावित्र्य कायम राहण्यासाठी शहरातील काही प्रमुख लोकांची समिती गठित करण्यात यावी व समितीच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहाराची वास्तू उभी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही तर 15 ऑगस्ट पासून मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कायद्याच्या सनदशीर मार्गाने नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.