बंद ‛कार’ मध्ये ‛तीन’ लहान मुलांचे ‛मृतदेह’ आढळले

नागपूर : नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका गॅरेज समोर उभ्या असलेल्या कार मध्ये तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. तौसिफ खान (वय 4 वर्ष) , आलिया खान (वय 6) आणि आफरीन खान (वय 6 वर्ष) अशी या मुलांची नावे असून या घटनेनंतर नागपूर शहरात एकच खळबळ माजली आहे.

सध्या लहान मुलांचे गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नागपूर च्या फारूक नगरमधून कालपासून तीन लहान मुले गायब झाल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अनेक ठिकाणी मुलांची शोधाशोध केल्यानंतर अखेर या मुलांच्या पाल्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी डॉग स्कॉड पाचारण केले होते. एका गॅरेज समोर उभ्या असलेल्या कार जवळ गेल्यानंतर श्वान तेथेच थांबून कारकडे पाहून इशारे करू लागल्याने पोलिसांनी कार चे दरवाजे उघडल्यानंतर त्यामध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. घातपात आहे की मुले खेळता खेळता गाडी लॉक होऊन त्यांचा आतमध्ये मृत्यू झाला याचा तपास पोलीस करत आहेत.