दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत पती, पत्नीचे मृतदेह आढळून आले असून यामुळे पारगावमध्ये एकच खळबळ माजली आहे.
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार विकास जगताप (अंदाजे वय 45) आणि त्यांची पत्नी (अंदाजे वय 41) हे दोघे त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यांनी गळफास घेतला असावा कि यात अजून काही वेगळे आहे याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यांच्यामागे गळफासाच्या मागे वेगवेगळ्या शक्यताही गावाकऱ्यांकडून वर्तवल्या जात आहे. जगताप दाम्पत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या घरात आढळल्यानंतर पारगाव येथील नागरिकांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी त्वरित पोलिस पथक घटनास्थळी पाठवले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत.
पारगाव बनला हॉटस्पॉट..
पारगाव येथे नुकतेच सात जणांचे सामूहिक हत्याकांड घडले होते. या नंतर पुन्हा एकाचा मृतदेह आढळून आला होता. यातून पारगावकर सावरत नाही तोच पुन्हा जगताप दांपत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने पारगावमध्ये भीतीदायक वातावरण तयार झाले असून क्राईम च्या विविध घटनांमुळे पारगाव हॉटस्पॉट बनले आहे.