केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज बालआनंद मेळावा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ही ग्रामपंचायत सदस्य निलेश कुंभार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्हारी शेंडगे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आली.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला पालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळा परिसर फुगे व आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध चविष्ट पदार्थ, खाऊचे स्टॉल लावले होते. लहानग्यांनी मोठ्या आनंदाने या उपक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. ज्योती हिरवे व सहकारी शिक्षिका सौ. भाग्यश्री केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमाला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.







