दौंड : दौंड मधील रेंगाळलेल्या बुद्ध विहार कामाविरोधातील दलित संघटनांनी सुरु केलेले धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आयोजकांनी दिली आहे.
धरणे आंदोलकांची काय होती मागणी – दौंड शहरातील नियोजित बुद्ध विहाराच्या कामाला नगरपालिका जाणीवपूर्वक विलंब करीत आहे, संबंधित ठेकेदाराला त्याने आत्तापर्यंत केलेल्या कामाचे पैसे नगरपालिकेने अदा करूनही त्याने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे बंद ठेवलेले बुद्ध विहाराचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमित सोनवणे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सागर उबाळे, तसेच भीम वॉरियर्स चे प्रमोद राणे रजपूत यांसह येथील दलित संघटनांनी केली होती आणि बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
यावेळी बुद्ध विहाराचे काम बंद ठेवून बुद्धविहाराच्या संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले होते या कामासही दलित संघटनांनी विरोध दर्शवीत सदरचे काम बंद करण्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आंदोलन स्थळी भेट देत दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून मागण्या समजून घेतल्या. बुद्ध विहाराच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर बुद्धविहाराचे काम सुरू होईल असा तोडगा काढला जाईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला व नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारीही आपल्याशी संवाद साधतील अशी व्यवस्था केली जाईल असेही राहुल कुल यांनी आंदोलकांना सांगितले.
यावेळी उपस्थित असलेले आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकारी सतीश थोरात यांना आंदोलक व संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मध्यस्थी करण्याची जबाबदारी आ.राहुल कुल यांनी त्यांच्यावर सोपविली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सतीश थोरात हे नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी घेऊन आले व त्यांची आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. यावेळी बुद्ध विहाराचे काम त्वरित सुरू करण्यात यावे व जोपर्यंत बुद्ध विहाराचे काम होत नाही तोपर्यंत संरक्षक भिंतीचे काम थांबवावे अशी मागणी आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली.
यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले की, सदर जागेचे तालुका भूमी अभिलेख, दौंड मार्फत सीमांकन करून काम सुरू केले आहे. सदर काम थांबविल्यास व जास्त वेळ वाया गेल्यास अंतिम केलेल्या भिंतींच्या सीमा पुन्हा विस्कळीत होऊ शकतात व कामासाठी भविष्यात निधी कमी पडू शकतो. त्यामुळे चालू असलेले काम थांबवू नये. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरपालिकेला बुद्धविहाराचे काम सुरू करणे बाबत पत्र देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेकडून आंदोलकांना पत्र देण्यात आले आहे त्यात असे नमूद केले आहे की, बुद्ध विहार बांधकामाचे संबंधित ठेकेदार यांना काम सुरू करणे बाबत लेखी व तोंडी कळविले आहे. तांत्रिक अडचणीमुळे सदर बांधकाम सद्यस्थितीत बंद आहे. उपरोक्त बाबींचा विचार करून आंदोलन करू नये अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे.
सदर बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे. जर पुढील पाच दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी संबंधित खात्यांना यावेळी दिला.