अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. शहरातील पारंपारिक प्रतिस्पर्धी जोमाने तयारीला लागलेले आहेत, त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी अनेक नवख्या उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आपण तयार असल्याचे चित्र उभे केले आहे.
नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजपा, आरपीआय, पीआरपी आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व मित्रपक्ष या दोन्ही गटांमध्येच निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांकडे माजी नगरसेवक तसेच नवख्या इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याने तिकीट वाटप प्रक्रियेत अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही गटाने अद्याप पॅनल मधील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे पॅनल मध्ये फिल्डिंग लावून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
भले भले उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळते की नाही या चिंतेत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर पासून सुरू असून 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याने दोन्ही गटाकडे इन्कमिंग व आउटगोइंग मोठ्या प्रमाणात सुरू राहणार असल्याचे शहरातील राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
दौंडच्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण राखीव आहे. कुल- कटारिया तसेच जगदाळे गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नक्की कोण असेल याचीही मोठी उत्सुकता दौंडकरांना लागून राहिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना प्राधान्य देऊन त्यांना संधी द्या अशी भूमिका मा. शरद पवार यांनी जाहीर केली आहे. कुणबींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची राज्यात कार्यवाही सुरू झाल्यानंतर मराठा समाजातील अनेकांनी हे प्रमाणपत्र मिळविले आहे. मात्र यामुळे मूळ ओबीसी समाजात नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर मूळ ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी शरद पवार गटाने मूळ ओबीसी उमेदवारांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. पवार साहेबांच्या या भूमिकेमुळे अन्य पक्षांनाही आता या गोष्टीचा विचार करावाच लागणार आहे. अशा परिस्थितीत दौंड मध्ये दोन्ही गट नगराध्यक्ष पदाबाबत काय निर्णय घेतात आणि कोणाला उमेदवारी देतात याची दौंडकरांमध्ये उत्सुकता आहे.
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील 13 प्रभागांसाठी 26 उमेदवार रिंगणात असणार आहेत. यापैकी 50% जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलाकरिता राखीव आहे. शहरातील तेरा प्रभागात एकूण 50 हजार 489 मतदार असून त्यापैकी 25 हजार 341 पुरुष मतदार तसेच 25 हजार 145 स्त्री मतदार तसेच तीन इतर मतदार 54 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.







