The accused recovered from the corona : दौंडच्या सबजेल मधील 10 आरोपींची कोरोनावर मात



| सहकारनामा |

दौंड : दौंड पोलीस स्टेशनच्या सब जेल मधील कोरोना ग्रस्त झालेल्या आरोपींची दौंड पोलिसांनी योग्य देखभाल व औषधोपचार केल्याने आरोपी कोरोना मुक्त झाले आहेत. येथील सब जेल मध्ये न्यायालयीन कोठडीतील 23 व पोलीस कोठडीतील 3 असे 26 आरोपी होते. दि.14 एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडीतील सहा आरोपींना अचानक ताप आल्याने आरोपींची दक्षता म्हणून सर्वांचीच कोरोना (अँटी जेन) तपासणी करण्यात आली असता न्यायालयीन कोठडीतील एकूण 10 आरोपींना कोरोना झाल्याचे निदान झाले.

हे दहा आरोपी दौंड व यवत पोलीस स्टेशन मधील गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यांची सुरक्षितता पुरविणे या मुद्द्यांवर विचार केला असता पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे व तहसीलदार संजय पाटील यांच्याशी चर्चा करून या कैद्यांना सब जेल मध्येच विलगीकरण करण्यात आले. 

मयूर भुजबळ तसेच दौंड पोलिसांनी या कैद्यांची दिवसातून 3/4 वेळा तपासणी करून त्यांची विचारपूस करून त्याच्या नोंदी ठेवल्या, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचे औषधोपचार करण्यात आले, त्यांना चांगला आहार देण्यात आला तसेच त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून त्यांचे समुपदेशन पोलिसांनी केले.

14 दिवसांनी (28 एप्रिल) या सर्वांची कोरोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव आला. उपअधीक्षक मयूर भुजबळ व दौंड पोलिसांनी योग्य काळजी घेतल्या बद्दल कोरोना मुक्त झालेल्या कैद्यांनी त्यांचे आभार मानले.