रिलायन्स ज्वेल्सवर ‘पावणे सात कोटींचा’ दरोडा टाकणाऱ्या ‘त्या’ म्होरक्याला अटक

सुधीर गोखले

सांगली : विश्रामबाग परिसरातील मार्केट यार्ड जवळील रिलायन्स कंपनीच्या ‘रिलायन्स ज्वेल्स’ या दुकानावर 5 जून रोजी भर दुपारी धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. अगदी हाकेच्या अंतरावर विश्रामबाग पोलीस ठाणे असूनही हा सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हानच दिले होते. मात्र सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अगदी नियोजनबद्ध आराखडा तयार करून या सशस्त्र दरोड्यातील म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुबोध सिंग असे या संशयिताचे नाव असून त्याला न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या मुख्य सूत्रधारास सांगली पोलिसांनी पाटणा येथील कारागृहातून ताब्यात घेतले. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी माहिती देताना, सुबोधसिंग ईश्वर प्रसाद सिंग (रा. चिश्तीपूर ठाणा चंडी जि नालंदा राज्य बिहार) असे मुख्य आरोपीचे नाव असून हा सराईत दरोडेखोर आहे. आमच्या टीम ने त्याला पाटणा येथील बेवूर च्या कारागृहातून ताब्यात घेतले. आतापर्यंत सुबोधसिंगवर देशभरात दरोड्यासंह विविध असे ३२ गुन्हे दाखल आहेत. त्याने कारागृहातूनच सांगली येथील रिलायन्स ज्वेल या दुकानावर धाडसी दरोड्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जून महिन्यातील पहिल्या रविवारी हा सशस्त्र दरोडा रिलायन्स ज्वेल वर पडला होता हा धाडसी दरोडा सुबोध सिंग याच्या टोळीने घातला. आपण पोलीस असल्याची बतावणी करून आपल्याला या दुकानाची पाहणी करायची असल्याचे या टोळीने सांगितले होते. आणि शस्त्राचा धाक दाखवून तब्बल पावणे सात कोटी किमतीच्या दागिन्यांवर या टोळीने डल्ला मारला. या दरोड्यानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे सांगली पोलिसांनी चारही दिशांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली तपास पथके तैनात केली होती. राज्यभरातील विविध तपास यंत्रणा या तपासकरता सांगली मध्ये आल्या होत्या.

या दरोड्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथकांनी बिहार, कोल्हापूर, ओडिसा, हैद्राबाद आणि कोलकत्यामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीतून या दरोड्यातील गणेश उद्धव बद्रीवर (हैद्राबाद), प्रताप अशोकसिंग राणा ( बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंह (बिहार) आदींचा सहभाग निश्चित झाला होता. काही दिवसांपूर्वी ओडिसा येथेही अशाच प्रकारचा दरोडा पडला होता मात्र तो यशस्वी झाला नाही उलट हे तिघे पोलिसांच्या जाळ्यात आले.

तुरूंगातूनच टोळीचे नेतृत्व
सूत्रधार सुबोधसिंग हा कुख्यात दरोडेखोर आहे. त्याने या दरोड्याचा आराखडा तुरूंगातूनच केला. व्हिडिओ कॉल द्वारे तो आपल्या सहकाऱ्यांशी या दरोड्याच्या सूचना देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाईल मधील इंटरनेट आणि व्हाट्सअप चा वापर करून त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत या दरोड्याचे प्लॅनिंग केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी सांगितले.

विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त
सध्या सुबोधसिंग याला विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले असून तो सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सांगली पोलिसांना आता कोणत्याही प्रकारची ‘रिस्क’ घ्यायची नाही या हेतूने हा बंदोबस्त ठेवला गेला आहे.
अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर आहे सुबोधसिंग
कुख्यात आरोपी सुबोधसिंग हा अभियांत्रिकी शाखेमधून पदविका प्राप्त असून, प्रत्यक्ष गुन्हा घडताना तो त्याच्या सहकाऱ्यांशी मोबाईल फोन वरून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होता. तो त्यांना मार्गदर्शन करत असल्याचेही उघड झाले आहे. सुबोधसिंग हा ‘टेक्नोसेव्ही’ आहे.

सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे हे अधिक तपास करत असून त्यांना सहायक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार, अकिब काझी, अंमलदार संदीप गुरव, सागर लवटे, बसवराज शिरगुप्पी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, संदीप घस्ते हे मदत करत आहेत.