यवत परिसरात भाईगिरी वाढली, वेळीच आवर घातला नाही तर परिणाम भोगावे लागणार

समीर सय्यद

यवत : दौंड तालुक्यातील यवत आणि परिसरात कमी वयामधील तरुणांमध्ये भाईगिरी करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली असून यवतकरांच्या दृष्टीने हा मोठा चिंतेचा बनला आहे. वाहनांचे सायलेंसर काढून भरधाव वाहने पळवणे, टोळक्याने फिरून दहशत निर्माण करणे, भाईगिरी स्टाईल भांडणे करणे असले प्रकार सध्या वाढू लागले आहेत. उद्भवणाऱ्या या सर्व परिस्थितीला  नक्की ती मुले, आई वडील कि पोलीस जबाबदार आहेत..? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार तरुणांकडून विविध रस्त्यांवर, हॉटेलवर, चहाच्या टपऱ्यांवर विनाकारण गर्दी करून थांबणे, मोटरसायकलचा जमाव करून गावात जमावाने फिरणे, गुंडगिरीचे वातावरण निर्मिती करणे असे अनेक प्रकार सर्रासपणे केले जात आहेत. या सर्व प्रकारांवर त्या मुलांच्या पालकांचे आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याचा नाहक त्रास सामान्य जनतेला भोगावा लागत आहेतच मात्र त्याचबरोबर परिसरामध्ये चालणारे रात्रीचे हॉटेल, पानाच्या टपऱ्या, अवैध धंदे या समस्येला चालना देत असल्याचे दिसत आहे. यवत मध्ये काही ठिकाणी रात्री अपरात्री मद्यपान, जुगार असे अनेक बेकायदेशीर कृत्य सर्रासपणे चालतात असाही आरोप नागरिक करत आहेत.

काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलवर दोन गटात तुफान हाणामारी झाली त्याचे पडसाद त्याच रात्री उमटून एका लोक वस्तीत दगडफेक झाली. या घटनेमुळे यवत गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि या सर्व घटना पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असणाऱ्या लोकवस्तीत घडल्या असल्याने पोलिसांनी अशा टवाळखोरांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कडक कारवाई करावी करून वेळप्रसंगी अशा आरोपींची चौकातून धिंड काढून त्यांच्याबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

आपली दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे काही तडीपार गुंड पुन्हा एकदा या भागात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. हे लोक तडीपारीचा कालावधी संपण्या आधीच पुन्हा यवतमध्ये राजरोसपणे दहशत निर्माण करत फिरत असल्याचे लोकांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाणे वेळीच कठोर पावले उचलून कडक कारवाई केली नाही तर मात्र यवतमध्ये एखादी भयंकर घटना घडल्याशिवाय राहणार नाही अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.