बाबो.. पुणे, अहमदनगर येथील 11 मंदिरे फोडून सोन्याचे दागिने, मुकुट चोरी करणाऱ्यास पुणे ग्रामिण पोलिसांनी पकडले | 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : आंबेगाव, शिरूर, शिक्रापुर, रांजणगाव, खेड या भागांतील मंदिरांमध्ये सोने, चांदी आणि मुकुटांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामिण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ११ मंदीर चोरी गुन्ह्यांची उकल करुन  सुमारे ४,००,०००/- रु. (चार लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात पारगाव (कारखाना) येथील पोलीसांनी उत्तम कामगीरी बजावली आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिकापुर, रांजणगाव, खेड भागात मागील काही दिवसापासून मंदिर चोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलास मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे व प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. ११४ / २०२४ भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ ( ४ ), ३०५ (३) या गुन्ह्याचा तपास चालू होता.  पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पो. हवा. अमोल वडेकर, पो. कॉ. संजय साळवे व पो. कॉ. मंगेश अभंग हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना काही महिन्यापासून वेगवेगळया पोलीस ठाणे हद्दीत जावुन मंदीर चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करीत होते. त्यावेळी एक संशईत इसम चोरी करत असल्याचे त्यांना आढळुन आले.

सदर इसमाबाबत तांत्रिक दृष्टया तपास करून गोपनीय बातमीदारमार्फत माहिती काढण्यात आली त्यावेळी सी.सी.टी.व्ही.मधील इसम हा विनायक दामू जिते हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पारगाव (कारखाना) पोलीसांना झाली. सदर इसम हा शिक्रापूर  येथे येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळताच पो. कॉ. संजय साळवे व पो. कॉ. मंगेश अभंग यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले व मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर त्यास पोलिस स्टाईलने अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने मंदिर चोरीची कबुली दिली. आरोपी विनायक दामूजिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि.पुणे) यांस वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने दि. ३१/०७/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. तो पोलीस कस्टडीमध्ये असताना मंदिर चोरी बाबत त्याचेकडे अधिक विचारपुर केली असता त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर,जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे सांगीतले.

त्यास आणखी विचारपुस करून तपास केला असता त्याने शिक्रापूर येथील राउतवाडी येथील श्रीनाथमस्कोबा मंदीर, शिक्रापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसरयेमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडे गव्हाण पारनेर व नगर एम. आय. डी. सी. येथील खंडोबा मंदिर शिव मल्हारगड पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिर चो-या केल्या असल्याचे सांगीतले.

आरोपीने १,६३,००० /- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने, १,१७,००० /- रु. किंमतीचे चांदी मुखवटे, ८० हजाराच्या पितळी धातूच्या वस्तु,  ३२ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोख रक्कम असा एकूण ४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता तो पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सदरची कामगीरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सर, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग अमोल मांडवे, पो.नि. अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण) यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे, भाऊसाहेब लोकरे (पोलीस उपनिरीक्षक), पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, पो.ना.शांताराम सांगडे, रमेश इचके, पो.कॉ. संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, सर्व पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे व पो.हवा. विक्रम तापकीर, पो.कॉ.निलेश सुपेकर, मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी केली आहे.