टेस्टीबाईट कंपनीत अमोनिया गॅस गळती होऊन 14 जण अस्वस्थ, त्या तिघांची प्रकृती आता सुधारली

दौंड : दौंड तालुक्यातील भांडगाव येथे असणाऱ्या टेस्टी बाईट या कंपनीत अमोनिया गॅस या विषारी वायूची गळती होऊन 14 जण अस्वस्थ झाले आहेत. यात तिघांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना लोणीकाळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. त्या तिघांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून आता काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगण्यात आले आहे.

विषारी वायू गळतीची ही घटना बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेत 14 कामगार अस्वस्थ झाले. कामगारांना त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना त्वरीत दवाखान्यात भरती करण्यात आले. टेस्टी बाईट ही खाद्य बनवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असून सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी काळजी का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.