राज्यात ‛या’ तारखेपासून तमाशा फड सुरू, लोक कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई : राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन लागल्यानंतर अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले होते. यात लोककला, सिनेमा थिएटर आणि अन्य मनोरंजनाच्या गोष्टी ज्यामध्ये गर्दी होत असेल हे सर्व बंद झाले होते.
आता मात्र राज्यातील लोककलावंत आणि रसिकांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात येत्या 1 फेब्रुवारी पासून लोककला तमाशा सुरू होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती.
राज्यात तमाशा फड सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती त्यावेळी रघुवीर खेडकर यांनी दिली होती. यांच्याकडून मिळाली होती. आता सरकारने राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून परवानगी दिली असल्याने व त्याच दिवशी जीआर काढणार असल्याने लोककलावंतांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
याबाबत रघुवीर खेडकर यांनी राज्यशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. राज्यात लॉकडाउन नंतर लोक कलावंतांची झालेली फरफट आणि वाईट अवस्था आम्ही डोळ्यांनी पाहिली आहे. या निर्णयामुळे निश्चित लोक कलावंतांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

डॉ.अशोकबाबा जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य थिएटर चालक, मालक संघटना