प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणाऱ्या दीपक काटेवर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

अख्तर काझी

दौंड : अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई फेकण्याची व तोंडाला काळे फासण्याची घटना घडली. या संतापजनक घटनेचा येथील संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या घटनेतील हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील पासलकर, शहराध्यक्ष प्रवीण गोरे सह विजय भोसले, संतोष पवार, अमित सोनवणे ,प्रमोद राणेरजपूत, राजाभाऊ कदम, अमित पवार, प्रमोद सावंत, बी.वाय. जगताप आदी पदाधिकारी तसेच एमआयएम चे मतीन शेख उपस्थित होते.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.13 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्या वर अक्कलकोट येथे भाजपा युवा मोर्चा चा पदाधिकारी दीपक काटे नावाच्या हल्लेखोर गुंडाने भ्याड हल्ला केला. प्रवीण गायकवाड हे शिव- शाहू- फुले- आंबेडकर विचाराचे निष्ठावंत अनुयायी आहेत. संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून ते बहुजनांसाठी काम करतात. त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवराय- शाहू- फुले- आंबेडकर विचारधारेवर झालेला हल्ला आहे.

संभाजी ब्रिगेड या हल्ल्याचा निषेध करते. संबंधित गुंड प्रवृत्तीच्या दीपक काटे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व शिवधर्म फाउंडेशन वर बंदी आणावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने त्याला उत्तर देण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.