अख्तर काझी
दौंड : राज्यात ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवू अशी भाषा करून, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दौंड ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. संघाच्या वतीने याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी ब्राह्मण सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यात राजकीय उद्देशाने सर्व समाजात ब्राह्मण समाजास वेगळे काढण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दिसते आहे. या माध्यमातून समाजाचा अवमान होत असून ब्राह्मण समाजाची निर्भत्सना केली जात आहे. यामुळे समाजाच्या संविधानिक अधिकारावर गदा येत आहे. काही दिवसापूर्वी, ब्राह्मण समाजास तीन मिनिटात संपवू अशी जाहीर धमकी देण्यात आली आहे.
संबंधित व्यक्तीवर जातीचा उल्लेख करून, ब्राह्मण समाजाचा अवमान करणे व खुनाची धमकी देणे याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सोशल नेटवर्कवर ब्राह्मण समाजाचा अवमान करणाऱ्या हजारो पोस्ट आल्या आहेत. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था कोण आहेत? या गोष्टी कोण घडवत आहेत याची चौकशी करून, समाजातील नागरिकांचे घटनात्मक अधिकार धोक्यात येऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.
राष्ट्रकार्यात समाजातील व्यक्तींचे प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान असून त्यांचे मनोबल खचविणे हा यात व्यापक उद्देश असून सातत्याने होणाऱ्या अवमानाने समाजातील व्यक्तींना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. समाजाच्या सुरक्षेच्या व्यापक उद्देशाने उपरोक्त मुद्द्यावर उपाय योजले जावेत अशी माफक अपेक्षा निवेदनातून करण्यात आली आहे.