दौंड वन परीक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचे निलंबन, वृक्षातोड आणि कोळसाभट्टी प्रकरण भोवले!

अब्बास शेख

दौंड : गेल्या काही महिन्यांपासून वन क्षेत्रामध्ये गाजत असलेल्या कोळसा भट्टी आणि वृक्षतोड प्रकरणी आत्तापर्यंत एक वन परीक्षेत्र अधिकारी, एक वनपाल आणि एक वन रक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे.

दौंड तालुक्यात विस्तारलेल्या वन क्षेत्र परिसरातील राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलुज येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती. येथील वृक्ष तोडून त्याचा कोळसा तयार करण्यासाठी येथे अनधिकृत कोळसा भट्ट्या उभारण्यात आल्या होत्या असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे होते त्यामुळे यातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. हे प्रकरण तप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर याची चौकशी सुरु झाली आणि यानंतर येथील वनपाल रवींद्रमगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबित करण्यात आले होते मात्र आत्ता खुद्द दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचेही निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोडसे यांच्या निलंबनाच्या वृत्ताची पुष्टी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी केली आहे.

गेल्या काही कालावधीमध्ये दौंड तालुक्यातील नदी काठच्या पट्ट्यामध्ये वृक्ष तोड आणि कोळसा तयार करणाऱ्या तस्करांनी हैदोस घातला होता. त्यामुळे मलठण येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्यावतीने वनपाल, वनरक्षक व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत होती. हे प्रकरण चिघळल्यानंतर सहाय्यक उप वन संरक्षक दीपक पवार यांनी येथील गावांमध्ये येऊन पाहणी केली होती. या पाहणीत त्यांना जागोजागी वृक्षतोड, माती उपसा तसेच कोळसा भट्ट्या आढळून आल्या होत्या. हा संपूर्ण अहवाल त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्यानंतर पुणे विभागाचे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी वनपाल रवींद्र मगर आणि वनरक्षक किरण कदम यांच्या निलंबिनाचे आदेश दिले होते.

हे सर्व होत असताना यात वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या निलंबनाचीही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. त्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत तालुका मुख्य वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कल्याणी गोडसे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येऊन मुख्य वन संरक्षक पुणे यांनी त्यांचे अखेर निलंबन केले आहे.