राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो अशी म्हण प्रचलित आहे आणि याचा अनुभव आज बारामतीकरांनाही आला. निमित्त होते खा. सुप्रिया सुळे आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या भावी उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या गळाभेटीचे.
आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारामती येथील जळोची येथे असणाऱ्या काळेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे ह्या अचानक समोरासमोर आल्या. मग काय सुनेत्रा पवार यांनी समोरून आलेल्या नणंद आणि लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांना गळाभेट देऊन त्यांचे स्वागत केले. इतक्यावरही या दोघी न थांबता त्यांनी एकदुसऱ्याला शुभेच्छाही दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती लोकसभेच्या भावी उमेदवार सुनेत्रा पवार या दिवसभर बारामती येथील विविध शिव मंदिरांमध्ये आज भेटी देत होत्या. या दरम्यान, संध्याकाळी त्या जळोची येथील शिवमंदिरात दर्शनासाठी आल्या आणि दर्शन घेऊन बाहेर पडत असताना समोरून खा. सुप्रिया सुळे या आल्या. यावेळी दोघींनी परस्परांशी हस्तांदोलन करून गळाभेट घेतली आणि एकदुसऱ्याला शुभेच्छा दिल्या. हे सर्व होत असताना येथे उपस्थित असणारे दोन्ही गटातील कार्यकर्ते मात्र एकदुसऱ्याच्या तोंडाला पाहत होते.