लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सुनेत्रा पवार’ यांचा दौंड दौरा निश्चित, भाजपासह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची घेणार भेट

अख्तर काझी

दौंड : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांनी आपल्या मतदार संघात तयारी सुरू केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) पक्षांनी महायुती करून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय केलेला आहे.

अद्याप कोणत्या पक्षाला कोणता मतदार संघ मिळणार आहे याचा निर्णय झालेला नाही. परंतु बारामती लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे जवळपास निश्चित असून पक्षाचे उमेदवार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे असे संकेत मिळत आहेत. याचे कारण सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदार संघातील पक्षाच्या व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी सुरू केल्याचे दिसते आहे.

त्या अनुषंगाने 26 फेब्रु. रोजी सुनेत्रा पवार या दौंड शहराला भेट देणार असून यावेळी मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी त्या चर्चा करणार असल्याचे पक्षाचे मा. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, उत्तम आटोळे, विकास खळदकर, वैशाली धगाटे, ज्योती झुरंगे उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने या मतदार संघातील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चांगल्या तर काही कडवट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे तर काही ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. इंदापूर मधील भाजपाच्या पदाधिकारी अंकिता पाटील- ठाकरे यांनी तर अशी प्रतिक्रिया दिली आहे की, या लोकांनी (अजित पवार आणि कंपनी )आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याबाबत पत्रकार परिषदेला उपस्थित वैशाली नागवडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे अंकिता पाटील यांनी काही वक्तव्य केले असेल. परंतु महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते एकत्र येऊन अंतिम निर्णय घेतील असेही नागवडे म्हणाल्या.

सुनेत्रा पवार यांची उमेदवारी 100% अंतिम झाली आहे का ? असा प्रश्न वीरधवल जगदाळे यांना विचारला असता ते म्हणाले , सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी आम्ही मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर व्हायची आहे परंतु निवडणुकीच्या आधीची ही पूर्वतयारी आहे. आणि या मतदारसंघातून कोणी जरी उमेदवार असेल तर तयारी करावी लागणारच आहे असेही जगदाळे म्हणाले. दौंड मधील भाजपा, शिवसेना (शिंदे गट ),रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन रयत परिषद, आनंदराज आंबेडकर गट अशा विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट सुनेत्रा पवार घेणार आहेत अशी माहिती ही वीरधवल जगदाळे यांनी यावेळी दिली.