अब्बास शेख
बारामती लोकसभा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजईचा सामना पहायला मिळाला. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव करत सलग चौथ्यांदा खासदारपद अबाधित ठेवले आहे. मात्र या निवडणुकीची आकडेवारी आणि 2019 च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर कांचन कुल यांच्यापेक्षा जास्त मतांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याचे पहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणूक 2019 आणि 2024 मधील फरक – 2019 साली बारामती लोकसभा मतदार संघामध्ये एकूण 13,07,318 मतदान झाले होते त्या पैकी सुप्रिया सुळे यांना 6,86,714 मते पडली होती तर कांचन कुल यांना 5,30,940 इतकी मते पडली होती. या निवडणुकीत कांचन कुल यांचा 1,55,774 मतांनी सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता.
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 14,11,621 इतके मतदान झाले. त्या पैकी सुप्रिया सुळे यांना 7,32,312 इतकी मते पडली तर सुनेत्रा पवार यांना 5,73,979 इतकी मते पडल्याचे पहायला मिळाले. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा 1,58,333 मतांनी सुप्रिया सुळे यांनी पराभव केल्याचे दिसत आहे. कांचन कुल यांच्यापेक्षा 2,559 अशा जास्त मतांनी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केल्याचे दिसत आहे.
ओबीसी पर्व चे महेश भागवत यांना मात्र अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याचे दिसत असून त्यांना 15,663 इतक्या मतांवर समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी ओबीसी बांधवांनी आकडेवारीवरून ओबीसी फॅक्टर चालवल्याचे दिसत नाही. बारामती लोकसभा मतदार संघात नोटा ला एकूण 9,151 इतकी मते पडल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.