अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

मुंबई : एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशाल गवळी असे या बलात्कार, खून प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याने तळोजा कारागृहात आज रविवारी पहाटेच्या सुमारास टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आरोपी विशाल गवळी याने मागील वर्षी कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका भागात राहणारी एक तेरा वर्षीय बालिका घरातून दुकानात जात असताना त्या बालिकेला आमिष दाखवून स्वताच्या घरात नेले होते. त्याने तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्या बालिकेची घरातच क्रूरपणे हत्या केली होती.

त्याची पत्नी साक्षी गवळी ही कामावरून घरी परतल्यानंतर विशाल ने तिच्या मदतीने या बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव हद्दीत फेकून दिला होता. क्रूरकर्मा विशाल गवळी याने रविवारी पहाटेच्या सुमारास तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. शासनाने लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची घटनेची गंभीर दखल घेत हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांची हा महत्वपूर्ण खटला चालविण्यासाठी विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती.

या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याच्या पत्नी साक्षीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला होता. विशालचे तीन भाऊ शाम, नवनाथ आणि आकाश गवळी हे सराईत गुन्हेगार होते. त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी चार महिन्यापूर्वी पोलिसांनी ठाणे, रायगड, मुंबई जिल्ह्यातून तडीपार केले आहे.