दौंड नगरपरिषदेतर्फे “मेरी माटी मेरा देश” अभियानाचे यशस्वी आयोजन

अख्तर काझी

दौंड : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाने मेरी माटी मेरा देश हे अभियान आयोजित केले असून या अभियाना अंतर्गत पंचप्रण शपथ, वसुधावंदन, स्वातंत्र्यसैनिक शूरवीर जवानांचा सन्मान, वीरांना नमन करण्यासाठी नवीन शिलाफलकाचे अनावरण, हर घर तिरंगा अंतर्गत राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन अशा विविध उपक्रमांचे आयोजन दौंड नगर परिषदेतर्फे करण्यात आले.

वसुधावंदन अंतर्गत गजानन सोसायटी आणि ख्रिश्चन दफनभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले. दौंड नगरपरिषद टाऊन हॉल परिसरामध्ये शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त जवान अशा सर्वांना आज सन्मानपत्र, रोप, नारळ, गुलाबपुष्प आणि शाल देऊन गौरवण्यात आले. अशाप्रकारे उत्साहात मेरी माटी मेरा देश हे अभियान सुरू असून या उपक्रमांतर्गत देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्या शहराच्या हद्दीतील माती अमृत कलशा मध्ये भरून ती दिल्लीला , आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी स्मारक बांधण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे मेरी माटी मेरा देश या अभियानाची सांगता होईल. आज स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान कुंटुबीय आणि वीर जवानांचा सन्मान करण्यासाठी दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, गट विकास अधिकारी अजिंक्य येळे आणि पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील उपस्थित होते. दौंड नगर परिषदेतर्फे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य अधिकारी सुप्रिया गुरव, वसुली विभाग प्रमुख हनुमंत गुंड, तृप्ती साळुंखे, दीपक म्हस्के, स्मिता गाडे, सुजाता खाडे, शाहू पाटील तसेच सर्व अधिकारी ,कर्मचारी वर्ग यांनी परीश्रम घेतले. मेरी माटी मेरा देश हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्य अधिकारी डॉ. संतोष टेंगले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.