सुभाष आण्णा कुल दूध संघाची दमदार वाटचाल, संघाकडून दूध उत्पादकांना 1 कोटी 3 लाख 35 हजारांचा बोनस

गलांडवाडी, ता. दौंड येथील सुभाष आण्णा कुल दुध संघाची दमदार वाटचाल, वर्षभरात सुमारे २ कोटी लिटरहून अधिक दुध संकलन.. दुध उत्पादकांना मिळाला म्हशीच्या दुधाला ४८ रुपये ५२ पैसे तर गाईच्या दुधाला २६ रुपये २२ पैसे वर्षभरातील सरासरी दर अधिक ५० पैसे बोनस

दौंड : दौंड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल अध्यक्ष असलेल्या सुभाष आण्णा कुल दुध संघाने, आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एक वर्षभरात दमदार वाटचाल केली असून, वर्षभरात सुमारे २ कोटी लिटरहून अधिक दुध संकलन करण्यात आले आहे. तर दुध उत्पादकांच्या म्हशीच्या दुधाला ४८ रुपये ५२ पैसे आणि गाईच्या दुधाला २६ रुपये २२ पैसे सरासरी दर मिळाला आहे. गेल्या वर्षभरात संकलित केलेल्या दुधावर संघाकडून प्रतिलिटर ५० पैसे प्रामाणे १ कोटी ३ लाख ३५ हजार रुपयांचा बोनस दुध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. तर संघाच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस स्वरुपात देण्यात आला आहे.

या दूध संघाने उपपदार्थ निर्मिती करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये प्रामुख्याने तूप, पनीर, श्रीखंड, दही, लस्सी व ताक निर्मिती करून विक्रीस सुरुवात केली आहे. एक वर्षापूर्वी अमूल दुध संघाच्या बरोबर करार करून उत्पादकांना अधिकाधिक बाजारभाव मिळवून दिला आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून नवीन एक लाख लिटर क्षमतेची डेअरी व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून देखील शेतकरी व दुध उत्पादकांना अधिक चांगल्या सुविधा देणे शक्य होनार असल्याची माहिती कार्यकारी संचालक संदिप शितोळे यांनी दिली.

संघाचे संचालक निळकंठ बापू शितोळे, ज्ञानदेव कदम, धनजी शेळके यांच्यासह सर्वच संचालक मंडळ वेळोवेळी यामध्ये लक्ष देत आहेत तसेच दौंड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल व आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे शितोळे यांनी सांगितले.