पुणे : उरुळी कांचन येथील इनामदार वस्तीवर काही शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामिण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.१४ सप्टेंबर रोजी ही गोळीबाराची घटना घडली असून गुन्ह्यातील जखमी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते (दोघे रा. भिवरी ता.हवेली जि.पुणे) यांचे आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे) याच्याशी आर्थिक व्यवहार होते. सदर व्यवहारामध्ये दीड वर्षांपूर्वी फिर्यादी यांचे आरोपीकडे चाळीस लाख रुपये होते. सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपीने फिर्यादी व त्यांच्या साथीदार काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो, माझ्या घरी या असे म्हणुन त्यांना घरी बोलावून घेतले. यावेळी पैसे परत मागितल्याच्या रागातुन आरोपीने त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्टल मधुन फिर्यादी व त्यांच्या साथीदारावर चार राउड फायर करुन काळुराम गोते यांना जखमी केले.
उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशनकडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळुन गेल्याच्या मार्गाने शोध घेत असताना मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने या ठिकाणी जाऊन १) आरोपी बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली, जि.पुणे) याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे याने त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय ४२ वर्षे) २) जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे (१९ वर्षे) ३) आशा सुरेश भोसले (वय ५२ वर्षे) ४) निखील अशोक भोसले (वय २५ वर्षे सर्व रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे) यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वरिल सर्व आरोपीतांना मा. न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. जखमी काळुराम गोते यांच्यावर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु असुन त्यांच्यावर ०३ काडतुस फायर करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने एक बंदुक व एकशे पंच्याहत्तर जिवंत काडतुस पिस्टलचे जिवंत चाळीस काडतुस, दोन बॅरल, ३ खाली मॅग्झीन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) एस. डी. पी. ओ. बापुराव दडस, (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पो.नि शंकरपाटील स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे, पोसई अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे, उरुळी कांचन पो.स्टेचे सपोनि ज्ञानेश्वर बाजीगिरे, सपोनि स्था. गु. शा. चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळीकांचन पो स्टे चे अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ यांनी केली असून पुढील तपास उरुळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.