अख्तर काझी
दौंड : शहरातील हुतात्मा चौक परिसरात रेल्वे हद्दीमध्ये बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले राजगृह बुद्ध विहार आहे आणि या बुद्ध विहारा शेजारी नगरपालिकेची मोकळी जागा आहे. या जागेत नगरपालिका सुलभ शौचालय उभारणार असल्याची माहिती समोर आल्याने या नियोजित सुलभ शौचालयाच्या बांधकामास येथील सर्वच आंबेडकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. व नगरपालिकेकडे सदरचे बांधकाम बंद करण्याची मागणी केली आहे.
याबाबत नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, हुतात्मा चौकातील राजगृह बुद्ध विहार बौद्ध धम्माचे व आंबेडकरी चळवळीचे आस्थेचे व अस्मितेचे ठिकाण आहे. या बुद्ध विहाराच्या शेजारीच नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने स्वच्छतागृह बांधकाम इमारत मंजूर केलेली आहे. तरी बौद्ध बांधवांना धम्म उपासना सभा, बुद्ध पौर्णिमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध उपक्रम राबविताना शौचालयाच्या घाणीचा त्रास होणार आहे.
तसेच बुद्ध विहारात येणाऱ्या उपासकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा घाण वातावरणात बौद्ध उपासक मुक्त वातावरणात धम्माचे आचरण करणार नाहीत. तरी नगरपालिकेने सदरचे ठिकाणी शौचालय बांधून बौद्ध बांधवांच्या श्रद्धास्थानाला ठेच पोहोचवू नये अशी विनंती निवेदनातून करण्यात आलेली आहे.
राजेश मंथने, अमित सोनवणे ,बी. वाय. जगताप, अनिल धेंडे ,प्रमोद राणेरजपूत, सागर उबाळे ,जितू शिदगणे, आकाश पटेकर, राजू त्रिभुवन, विनायक माने, अनिकेत गायकवाड, दीपक सोनवणे, कांचनमाला धेंडे, अंकिता डेंगळे शिल्पा मंथने आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदन देतेवेळी शहरातील सर्वच आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीप चालक-मालक संघटनेचे वाहनतळ आहे. या संघटनेनेही नगरपालिकेला विनंती केली आहे की, वाहन तळाला लागून बुद्ध विहार आहे, गणपती मंदिर आहे तसेच बाजूलाच असणाऱ्या घरामध्ये व्यापारी संघटनेच्या वतीने गरजू लोकांना रोज भोजन दिले जात आहे. त्यामुळे सदर जागेवर शौचालय न बांधता दुसऱ्या पर्यायी जागेवर बांधावे अशी विनंती जीप चालक-मालक संघटनेकडून करण्यात आली आहे.