अख्तर काझी
दौंड : हॉटेल मधून जेवण करून घरी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा भर दिवसा रस्त्यातच विनयभंग करण्यात आल्याची घटना दौंड शहरातील हिंद टॉकीज रस्त्यावर घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या किरण राजू पवार, चंद्रकांत धोत्रे (रा. वडार गल्ली, दौंड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 74,351(2),3(5), बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलींचा भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर रोड रोमिओंनी विनयभंग केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 18 मार्च रोजी दुपारी 4.30 वा. च्या दरम्यान येथील हिंद टॉकीज समोरील रस्त्यावर घडली. फिर्यादी मुलगी व तिची मैत्रीण शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात होते. दरम्यान हिंद टॉकीज समोरील रस्त्यावर किरण राजू पवार व चंद्रकांत उर्फ हड्डी धोत्रे दुचाकीवर आले.
त्यांनी मुलींच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी लावली. यातील चंद्रकांत धोत्रे याने फिर्यादी मुलीच्या अंगावरील ओढणी ओढली व तिचा हात धरून माझ्याबरोबर चल म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. किरण पवार याने फिर्यादीच्या मैत्रिणीचा हात धरून तिला गाडीवरून खाली खेचले व तिचा विनयभंग केला. घटनेनंतर मुली घाबरून दुचाकीवरून आपल्या घराकडे निघाल्या असता, वाटेत फिर्यादी मुलीचा भाऊ त्यांना भेटला. त्यांनी भावाला घडलेली हकीकत सांगितली. त्याच वेळेस पुन्हा दोघे आरोपी तेथे आले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या भावालाही शिवगाळ केली. दोघा आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.
मागील पंधरा दिवसांपूर्वीच आंबेडकर चौकातील परीक्षा केंद्राबाहेर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला दौंड पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये कारवाई करून त्याला तुरुंगात पाठविले आहे. असे असतानाही शहरात रोड रोमिओंचा उच्छाद कमी झालेला दिसत नाही असे चित्र आहे. विनयभंगा सारखे कृत्य करणाऱ्या रोड रोमिओ विरोधात त्यांना धडकी बसेल अशी कडक कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.