दौंड शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, बेवारस कुत्र्याच्या हल्ल्यात एकाचा जीव गेल्यानंतरही नगरपालिकेला गांभीर्य नाही!

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरातील रस्त्यांवरून फिरणाऱ्या बेवारस, मोकाट जनावरांचा नगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी व सागर उबाळे यांनी केली आहे.

दौंड नगरपालिकेला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, दौंड शहरातील वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील मोकाट व बेवारस जनावरांची संख्याही वाढलेली आहे. येथील बाजारपेठेत व मुख्य चौकातील रस्त्यांवर या प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो आहे, परिणामी लोकांना वाहतुकीच्या समस्यांना व अपघातांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील सर्व मुख्य चौकातील परिसर, कुरकुम मोरी, गोल राऊंड, बोरावके नगर, सरपंच वस्ती परिसरामध्ये मोकाट गाय, बैल, कुत्री अशा प्राण्यांचा कायम वावर आहे. कधी कधी हे प्राणी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर जीवघेणा हल्ला करीत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरूनच आपला प्रवास करावा लागत आहे.

हे सर्व प्रकार थांबाविण्यासाठी नगरपालिकेने शहरामध्ये किंवा शहरालगत जागा घेऊन कोंडवाडे स्थापन करावे. शहरातील अशा प्राण्यांमध्ये लंम्पी सारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याकरिता नगरपालिकेने अशी जनावरे ताब्यात घेऊन त्यांच्या देखभालीकरिता कोंडवाड्यात ठेवावी जेणेकरून त्यांची हिंसा होणार नाही. काहीतरी मार्ग काढून नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावाच असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

आज पर्यंत अनेक पक्ष, संघटनेने नगरपालिकेला अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून निवेदने दिलेली आहेत. मात्र नगरपालिकेने हा विषय कधीही गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. इतक्या मोठ्या शहरात(?) नगरपालिकेचा कोंडवाडा नाही व तो असावा म्हणून कोणीही आजपर्यंत प्रयत्न केलेले नाहीत अशी परिस्थिती आहे. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात शहरातील एका लहान मुलाचा जीव गेल्याची घटना सर्वांनी अनुभवली आहे मात्र तरीही प्रशासनाला जाग येऊ नये ही खरी शहरा साठी मोठी शोकांतिका आहे.