अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील खाटीक गल्ली परिसरात एका लहानग्यावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये मुजमिल अरबाज कुरेशी (वय 4 वर्ष) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, मुलगा आपल्या घराच्या परिसरात खेळत होता त्यावेळी चार ते पाच कुत्र्यांचे टोळके तेथे आले, त्यापैकी एका कुत्र्याने मुजमिलवर हल्ला केला. बेवारस कुत्र्याने मुलाच्या हाताला, पायाला व कमरेला चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमी मुलाला येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले व पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून दवाखान्यामध्ये जाण्यासाठी सांगितले आहे.
दौंड शहरामध्ये याआधीही पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील या मोकाट व बेवारस कुत्र्यांचा दौंड नगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.