पाटस टोल प्लाझा चा भोंगळ कारभार | आधी पेवर ब्लॉक, नंतर डांबर आणि आता एका पावसात लक्तरे वेशीवर

अब्बास शेख

केडगाव (दौंड) :
पुणे सोलापूर हायवेवर दौंड तालुक्यात पाटस टोल प्लाझा मोठ्या ऐटीत उभा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून येथे दररोज लाखो रुपये टोल वसूल केला जातो. मात्र ज्या पद्धतीने टोल घेतला जातो त्या पद्धतीच्या सुविधा येथे दिल्या जातात का हा एक संशोधनाचाच विषय म्हणावा लागेल.

येथील पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोल प्लाझा च्या कुणीतरी एका महान इंजिनयर कम ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी चक्क घराच्या अंगणात टाकण्यात येणारे पेवर ब्लॉक या महामार्गावरील खड्डयांमध्ये बसवून खड्डे बुजविण्याचा देशातील पहिला प्रयोग केला होता. या महान प्रयोगाच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरांतून टिकेची झोड उठल्यानंतर मात्र पुन्हा खड्डे खोदून हे पेवर ब्लॉक बाहेर काढण्यात आले आणि नंतर त्यामध्ये डागडुजीकरून डांबर फासण्यात आले. खड्डयांमध्ये घाई गडबडीत फासण्यात आलेले हे डांबर कितीकाळ तग धरेल यावरही चर्चा, टिका झाली. मात्र हे डांबर लवकर निघणार नाही असा जावई शोध डांबर फसणाऱ्यांनी लावत तसा विश्वास आपल्याला देहबोलीतून टोल भरणाऱ्या वाहन चालकांना दिला. एक पाऊस झाला अण ती देहबोली गायब झाली.

दादागिरी करून स्थानिकांना अरेरावी करणारे टोल चे बगलबच्चे आणि त्यांचे वरिष्ठ हे आता नेमके कोणत्या बिळात गायब झाले आहेत ते वाहनचालक आणि प्रवाश्यांना समजेना. एका पावसात ते फासलेले डांबर कोण्या गावाकडे गेले कळलेच नाही आणि पुन्हा तेथील खड्डयांनी डोके वर काढत आपली उपस्थिती तेथे दर्शवली आहे. या सर्व प्रकारामुळे वरवंड, चौफुला, केडगाव, यवत चे नागरिक भलतेच संतापलेले दिसत आहेत.

महामार्गावर चालणाऱ्या वाहनांची चाके या खड्डयांमध्ये आदळून पंक्चर होताना, फुटताना दिसत आहेत. काही ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत तर काही ठिकाणी या खड्ड्यांना चुकविण्याच्या नादात वाहनातील प्रवाश्यांना इजा होताना दिसत आहे.
मोठ्या प्रमाणावर टोल वसूल करूनही टोल प्रशासन किंवा एन.एच.ए.आय (NHAI) याकडे का दुर्लक्ष करत असावे यावर स्थानिक रहिवाशी आणि वाहन चालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल प्लाझा च्या अख्त्यारीत असलेल्या रस्त्यावरील सर्व खड्डे त्वरीत बुजवावेत अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असा ईशारा येथील रहिवाशी आणि वाहन चालक देत आहेत.

टीप : कृपया सहकारनामा च्या या बातमीतील मजकूर कुणीही आपल्या वृत्तपत्र अथवा न्यूज पोर्टलला छापू नये. अन्यथा कॉपीराईट क्लेम, स्ट्राईक ची कारवाई केली जाईल – संपादकीय विभाग