दौंड : महाराष्ट्र राज्यामध्ये ख्रिश्चन समाजावर तसेच समाजाच्या धार्मिक स्थळांवर (चर्च) समाजकंटकांकडून हल्ले होत आहेत, समाजाच्या धर्मगुरूंवर विनयभंगासारखे खोटे आरोप होत आहेत, काही कट्टर पंथीय संघटना ख्रिश्चन समाजाला जाणीवपूर्वक लक्ष बनवीत आहेत या सर्व प्रकारांचा दौंड मधील पास्टर वेल्फेअर असोसिएशनने निषेध नोंदविला.
ख्रिश्चन समाजावर अन्याय करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दौंड तहसीलदार व पोलीस स्टेशन कार्यालयाला याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील सर्व चर्च चे पास्टर तसेच ख्रिश्चन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मागील एक ते दीड वर्षापासून राज्यामध्ये व इतरत्र ख्रिश्चन समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंवर व त्यांच्या कुटुंबावर जीव घेणे हल्ले होत आहेत. चर्चची विटंबना होत आहे, चर्चमध्ये घुसून उपासनेमध्ये व्यत्यय आणणे व उपासनेसाठी मनाई करणे असेही प्रकार होत आहेत.
ख्रिश्चन समाज प्रलोभन देऊन धर्मांतर घडवून आणत आहेत असेही बिनबुडाचे आरोप करून ख्रिश्चन समाजाला समाजकंटकांकडून नाहक त्रास दिला जात आहे. धर्मगुरूंवर विनयभंगासारखे खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवून समाजामध्ये त्यांची बदनामी करणे असे प्रकार सर्रासपणे होत आहेत. आम्ही या देशाचे मूळ निवासी नागरिक आहोत, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारात राहून ख्रिश्चन समाज जीवन जगत आहे. समाजाच्या जगण्याच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. काही संघटनांकडून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा व शांतता भंग केली जात आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण ख्रिश्चन समाजासाठी असुरक्षित करणारे झाले आहे अशी मानसिकता समाजामध्ये झाली आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजाला न्याय व घटनेने दिलेले हक्काचे व अधिकाराचे जीवन जगण्यासाठी योग्य ते उपाय व प्रतिबंध व्हावेत.
ख्रिश्चन धार्मिक स्थळांना व उपासना मंदिरांना संरक्षण मिळावे तसेच समाजावर होणारे हल्ले रोखण्यात येऊन समाजावर हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.