दौंड : दौंड शहर येथे सुस्सज नाट्यगृह उभारण्यासाठी २ एकर शासकीय जागा देण्यास आज राज्य मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहिती नुसार, दौंड शहरात सुस्सज नाट्यगृह उभारण्यात यावे अशी दौंड तालुक्यातील नागरिकांची गेले अनेक वर्षे मागणी होती, याबाबत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी शासन स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा केला होता. याबाबत मंत्रालयात २ ते ३ वेळा बैठक देखील घेण्यात आली होती.
याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आमदार कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचेकडे केली होती.
आमदार राहुल कुल यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, दौंड येथील भोगवटादार वर्ग- २ या प्रकारातील २ एकर (८० आर) शासकीय जागा दौंड तालुका नाट्यगृह बांधकाम करण्यासाठी विनामुल्य कब्जे हक्काने उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांसाठी एक सुसज्ज नाट्यगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील काम सुरु करण्याचा मनोदय आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला. या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.